
राखणदाराचा झोपडी शेजारीच गाईंसाठी गोठा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे गोठ्यात गाई व वासरु बांधून राखणदार व त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य झोपी गेले हेाते.
तळोदा (नंदुरबार) : तळोद्यातील कोर्टाच्या मागील बाजूला असलेल्या शेतात बिबट्याने गाईच्या वासरु वर हल्ला केला. परंतु शेतातील राखणदाराचा कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने वासरु सोडून तेथून पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात वासरु जिवंत असून फक्त त्याच्या गळ्याला जखम झाली आहे. रहिवासी क्षेत्रात बिबट्याच्या वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळोद्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला व कोर्टाच्या मागील बाजूस विलास भिकाजी सूर्यवंशी यांचे शेत असून त्यात त्यांनी केळीची लागवड केली आहे. विलास सूर्यवंशी यांनी राखणदार ठेवला असून तो व त्याचे कुटुंब शेतातच राहतात. राखणदाराचा झोपडी शेजारीच गाईंसाठी गोठा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे गोठ्यात गाई व वासरु बांधून राखणदार व त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य झोपी गेले हेाते.
दबक्या पावलांनी बिबट्याचा हल्ला
बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरुवर हल्ला केला. परंतु राखणदारच्या पत्नीला आवाज आल्याने ती उठून गोठ्याचा दिशेला गेली असता तिला बिबट्याने वासरुवर हल्ला केल्याचे दिसून आले. तिने आरडा ओरडा केल्यावर आजूबाजूचे नागरिक जमा झाले. यानंतर बिबट्याने वासरु सोडून तेथून पळ काढला. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात वासरुच्या गळ्यात जखम असून वासरु जिवंत आहे.
यापुर्वीही केला होता हल्ला
आधीही या शेताला लागून असलेल्या एक ते दोन किलोमीटरचा परिसरातील शेतांमध्ये बिबट्याने शेतातील पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता तर थेट रहिवासी क्षेत्राला लागून असलेल्या शेतातच बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे