
दुर्मिळ अशी गिधाडे वाचवण्यासाठी संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी सातपुड्यातील गिधाडांसाठी वनविभागाने सुरू केलेली कृत्रिम खानावळ गिधाड संवर्धन व त्यांची संख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणार होती.
तळोदा ः पर्यावरणीय अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक व स्वच्छतादूत म्हणून गौरविल्या जाणाऱ्या गिधाडांचे अस्तित्व सातपुड्यातील सोजरबार, चांदसैली व गोऱ्यामाळच्या परिसरात कड्या कपारीत टिकून आहे. त्यांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागाने कृत्रिम खानावळ ही योजना राबवून प्रयत्न देखील सुरू केले होते. मात्र निधीअभावी ती खानावळ बंद करावी लागली. सातपुड्याच्या कडेकपारीत सुमारे पंधरा गिधाडे नैसर्गिक अधिवासात टिकून असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र त्यांचे संवर्धन होऊन संख्या वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
पर्यावरणाचा विशेष घटक म्हणून ज्यांची ओळख आहे अशा गिधाडांसाठी सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार हा गिधाड संवर्धन दिन म्हणून ओळखला जातो. तळोदा वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सोजरबार व गोऱ्यामाळ तसेच चांदसैली घाटाचा कडेकपारीत गिधाडांचे अस्तित्व असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यात प्राणी गणनाच्या शेड्युल एक मध्ये गिधाडांची गणना होते. त्यामुळे गिधाडे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत.
गिधाडे मृत प्राणी व जनावरांना खातात. त्यात जनावरांना देण्यात येणारे औषधे व रसायने यामुळे गिधाड संकटात सापडले आहेत. डायक्लोफिनॅक या औषधामुळे गिधाडांच्या किडनीवर थेट परिणाम होतो. तर जनावरांना दुधवाढीसाठी देण्यात येणाऱ्या ऑक्सिटोसीन औषधामुळे त्यांच्यातील प्रजनन क्षमतेवरच परिणाम होतो. ही बाब लक्षात घेता बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी व रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड यांनी पुढाकार घेतल्याने डायक्लोफिनॅक औषधावर बंदी घालण्याचा आदेश केंद्र शासनाने काढला होता. गिधाडांच्या संवर्धनासाठी तो निर्णय महत्त्वाचा ठरला होता. त्यामुळे जनजागृती होऊन त्या औषध वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले.
निधीअभावी कृत्रिम खानावळ बंद
दुर्मिळ अशी गिधाडे वाचवण्यासाठी संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी सातपुड्यातील गिधाडांसाठी वनविभागाने सुरू केलेली कृत्रिम खानावळ गिधाड संवर्धन व त्यांची संख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणार होती. मेलेली जनावरे त्यांच्या परिसरात जाऊन टाकण्याच्या सल्ला अनेकजण देतात. मात्र वन विभागाकडून कोणतीही कारवाई नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
तेवीसपैकी आठ गिधाडांच्या प्रजाती भारतात आढळतात. त्यापैकी काही प्रजाती ९९ टक्के तर काही ९७ टक्के नामशेष झाल्या आहेत. गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी व त्यापासून होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी खर्च करावा लागतो. सातपुड्यात आढळणाऱ्या दुर्मिळ वनपिंगळासाठी अभयारण्य घोषित व्हावे व गिधाडांसाठी बंद पडलेले कृत्रिम खानावळ सुरू करण्यात यावी, ज्यामुळे गिधाडांची संख्या वाढण्यास मदत होईल.
- प्रा.अशोक वाघ, प्राणी व पक्षी अभ्यासक, तळोदा.
संपादन- भूषण श्रीखंडे