esakal | निर्दयी पणाचा कळस; अखेर पाचव्या दिवशी सापडला 'त्या' बालिकेचा मृतदेह 
sakal

बोलून बातमी शोधा

निर्दयी पणाचा कळस; अखेर पाचव्या दिवशी सापडला 'त्या' बालिकेचा मृतदेह 

पोलिसांचे स्वतंत्र पथक नियुक्त करून बालिकेचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. त्यासाठी तळोदा पोलिसांची चार पथके दिवस-रात्र कार्यरत होती.

निर्दयी पणाचा कळस; अखेर पाचव्या दिवशी सापडला 'त्या' बालिकेचा मृतदेह 

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा : मोटारसायकलच्या धडकेत जखमी बालिकेला उचलून नेत दुचाकीस्वारांनी पोबारा केला होता. अखेर खेडले ते पिसावरदरम्यान तब्बल पाचव्या दिवशी दादरच्या शेतात मृतावस्थेत ती बालिका आढळून आली. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. मात्र, हे शेत गुजरात राज्याच्या हद्दीत असल्याने गुजरात पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर बालिकेचा मृतदेह निझर येथे नेण्यात आला. दरम्यान, तब्बल पाचव्या दिवशी बालिका मृतावस्थेत आढळल्याने पोलिसांपुढे दुचाकीस्वारांना शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 

आवर्जून वाचा- अरे व्वा ! दारूबंदी करणाऱ्या गावाला ५१ लाख रुयांचा निधी !
 


तळोदा-बोरद रस्त्यावर १९ जानेवारीला ऊसतोडणी कामगाराची मुलगी मुन्नी मोत्या पटले (वय ९) पाणी भरण्यासाठी जाताना रस्ता ओलांडत होती. त्या वेळी भरधाव येणाऱ्या दुचाकीने तिला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तशा अवस्थेतच दुचाकीस्वारांनी मुलीला दुचाकीवर बसवून तेथून पोबारा केला होता. घटनेची माहिती कळताच मुलीचे पालक व नातेवाइकांनी, कदाचित दवाखान्यात नेले असेल, असा कयास लावून रुग्णालयांमध्ये तपास केला. मात्र, मुलगी कुठेही सापडली नाही. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर तळोदा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलिसांचे स्वतंत्र पथक नियुक्त करून बालिकेचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. त्यासाठी तळोदा पोलिसांची चार पथके दिवस-रात्र कार्यरत होती. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिसदेखील घटनेच्या मागावर होते. मात्र, दुचाकीस्वारांचा व मुलीचा शोध लागत नव्हता. सोशल मीडियावर तसेच, तालुक्यातील प्रत्येक गावात पोलिस पाहणी करत होते. स्वतः पोलिस निरीक्षक नंदराज पाटील व त्यांचे सहकारी जनजागृती करत मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. अखेर शनिवारी (ता.२३) पिसावर येथील शेतकरी खेडले रस्त्याकडे जात असताना दादरच्या शेताजवळ त्यांना दुर्गंधी आली. त्यामुळे तेथे पाहिल्यावर त्यांना मृतावस्थेत मुलगी आढळून आली. त्यांनी तातडीने सरपंच बबन पानपाटील यांना माहिती दिली. पानपाटील यांना घटनेची माहिती असल्याने ते स्वतः कढेल येथे मुलीच्या आई-वडिलांना घेण्यासाठी गेले. आई-वडील आल्यानंतर मुलीचा मृतदेह ओळखला व त्यांनी टाहो फोडला. 
दरम्यान, ही घटना गुजरात राज्याचा हद्दीत असल्याने तातडीने निझर पोलिस ठाणे व तळोदा पोलिसांना माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलिस निरीक्षक नंदराज पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार, कॉन्स्टेबल संजय नाईक, युवराज चव्हाण, विजय ठाकरे, रवींद्र पाडवी, लक्ष्‍मण कोळी, गुन्हा अन्वेषण विभागाचे विशाल नागरे, बापू बागूल यांनी पाहणी केली. श्‍वान पथक व फॉरेन्सिक लॅब पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. श्‍वानाने दादरच्या शेतामधील पश्‍चिमेकडे धाव घेतली, मात्र खेडले- पिसावर रस्ता पूर्वेकडे असताना श्‍वान पश्‍चिमेकडे गेल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. 

आवश्य वाचा- पट्टेदार वाघाच्या आजही आढळल्या पाऊल खुणा !

निर्दयी दुचाकीस्वार शोधण्याचे आव्हान 
तब्बल पाच दिवसांनंतर बालिका मृतावस्थेत सापडली. ती अपघातात मृत पावली, की तिला गंभीर जखमी अवस्थेतच सोडून दुचाकीस्वार निघून गेले, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आता त्या निर्दयी मोटारसायकलस्वारांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मात्र, पोलिस आज ना उद्या त्या निर्दयी दुचाकीधारकांचा शोध घेतीलच, असा विश्‍वास बालिकेच्या नातेवाइकांनी व्यक्त केला.  

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image