चक्क सत्ताधारी उपनगराध्यक्षांवर आली उपोषणाची वेळ ! 

सम्राट महाजन
Thursday, 11 February 2021

तळोदा नगर पालिकेच्या हद्दीतील प्रभाग एक मध्ये विविध विकास कामांना तांत्रिक मान्यता देण्यास जाणीवपूर्वक विलंब होतो, मात्र इतर प्रभागात त्वरित कार्यवाही होते

तळोदा ः शहरातील विकास कामांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांबाबत तसेच सत्ताधारी उपनगराध्यक्षा असून देखील प्रभागातील विविध विकास कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या आरोप करीत भाग्यश्री चौधरी यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेच्या दिवशीच एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारले, यासंदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन देखील दिले. मात्र सत्ताधारी उपनगराध्यक्षा यांनाच उपोषण करावे लागल्याने शहरात चर्चा रंगली होती. 

आवश्य वाचा- वीज जोडणी कापण्यावरून महावितरण- भाजप पदाधिकाऱ्यांत खडाजंगी 
 

पालिकेच्या विद्यमान उपनगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, तळोदा नगर पालिकेच्या हद्दीतील प्रभाग एक मध्ये विविध विकास कामांना तांत्रिक मान्यता देण्यास जाणीवपूर्वक विलंब होतो, मात्र इतर प्रभागात त्वरित कार्यवाही होते. हा प्रकार कोणाच्या दबावाखाली होतो याचा खुलासा करण्यात यावा. प्रभाग एक मध्ये उत्कृष्ट दर्जाची विकास कामे होऊन देखील ठेकेदाराला देयके देण्यात विलंब होतो. आमराई फळीचा पूल अद्याप पावेतो मंजूर करण्यात आलेला नाही. तळोदा शहरात लावण्यात आलेले सौरपथदिवे अवघे चार तास चालतात, या बाबतीत तक्रार करून देखील दखल घेण्यात आली नाही.

मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण

तसेच प्रभागातील विविध ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे, पुलाचे बांधकाम करणे व अमरधाम बांधणे आदी कामे होण्यासाठी तीन वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक मान्यतेसाठी फी भरण्यासाठी नगरपालिका फंडात पैसे नाहीत असे उत्तर मिळते. पाणी पुरवठा विभागाचे नारायण चौधरी हे नेहमी बांधकाम विभागात असतात, त्यावर कार्यवाही करावी तसेच कॉलेज चौफुली ते आंबेडकर चौक पावेतो भूमिगत गटार बाबत ठराव होऊन तीन वर्षे उलटले तरी अजूनही त्या कामास मंजुरी नाही. नगरपालिकेच्या इमारती समोरील अतिक्रमण काढण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देखील निवेदनातून उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी दिला आहे. 

आवर्जून वाचा- एकाच वेळी १०० उपग्रह अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रम; भुसावळच्या विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग 

 

प्रभाग एक मध्ये विविध विकास कामांसाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच प्रभागात रस्त्याचे काम सुरुच आहे. पथदिवे संदर्भात संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून ऑडिट झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यात येणार नाही. 
-सपना वसावा, मुख्याधिकारी, तळोदा पालिका. 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda nandurbar municipal deputy mayor strike not work