
तरुणाईला लाजवेल अशा उत्साहात त्या सकाळी ओपन जिमवर व्यायाम करीत आहेत. आजींची ही ऊर्जा, उत्साह बघून इतर विशेषतः तरुण त्यांच्यापासून प्रेरणा घेतील यात शंकाच नाही.
तळोदा (नंदुरबार) : 'उम्र को अगर हराना है तो शौक जिंदा रखिए; घुटने चले या ना चले, मन उडता परिंदा रखिए' या ओळीनुसार येथील 76 वर्षीय आजी शरीराला व मनाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून नियमितपणे फिरायला जात आहेत. तरुणाईला लाजवेल अशा उत्साहात त्या सकाळी ओपन जिमवर व्यायाम करीत आहेत. आजींची ही ऊर्जा, उत्साह बघून इतर विशेषतः तरुण त्यांच्यापासून प्रेरणा घेतील यात शंकाच नाही.
शरीराला व मनाला निरोगी, तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज सकाळी लवकर उठून अथवा सायंकाळी फिरायला जाणे आणि व्यायाम, योगासने, प्राणायाम करणे आवश्यक आहे; असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र वेळ, कौटुंबिक अथवा इतर कारणे पुढे करुन असंख्य नागरिक व्यायाम, योगा, प्राणायाम करणे किंवा फिरायला जाणे टाळतात. अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच नागरिक ही दिनचर्या नियमितपणे पाळतात. काही नागरिक फक्त हिवाळ्यात एक फॅड म्हणून फिरायला जातात अथवा योगा, व्यायाम करायला सुरुवात करतात व काही कालावधी नंतर परत हे सर्व बंद करतात. मात्र तळोद्यातील नवीन वसाहतीत राहणाऱ्या 76 वर्षीय मंजुळाबाई भोई या सर्वांसाठी एक आदर्शचं आहेत.
दहा वर्षांपासून नाही खंड
मंजुळाबाई या गेल्या दहा वर्षांपासून नियमितपणे सकाळी लवकर उठून फिरायला जातात. हिवाळा असो की उन्हाळा इतकेच काय पावसाळ्यात सुध्दा त्यांच्या दिनचर्येत खंड पडलेला नाही. सकाळी फिरायला जायचं जणू त्यांना व्यसनच लागलं आहे. मात्र यामुळे या वयातही त्या शरीर स्वास्थ्य चांगले ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत.
सहजपणे व उत्साहात व्यायाम
शहादा रोडवर काही दिवसांपूर्वीच ओपन जिम उभारण्यात आली आहे. या जिम वरील उपकरणांचा वापर देखील मंजुळाबाई अगदी सहजपणे व उत्साहात करीत आहेत, ती दृश्ये बघून कोणालाही आश्चर्य वाटेल. त्यांच्यातील ऊर्जा, उत्साह नक्कीच इतरांसाठी विशेषतः युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
पूर्वी फिरायला जात होते मात्र त्यात नियमितता नव्हती. परंतु गेल्या 10 वर्षांपासून नियमितपणे रोज सकाळी लवकर उठून फिरायला जाते. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो व शारीरिक, मानसिक आरोग्य पण चांगले राहते. सर्वांनी नियमितपणे फिरायला गेले पाहिजे व व्यायाम केला पाहिजे.
- मंजुळाबाई भोई, तळोदा.
संपादन ः राजेश सोनवणे