esakal | इग्रजांनी सातपुड्यातील वाघ संपवले...का ? कशासाठी, तर वाचा सविस्तर ! 
sakal

बोलून बातमी शोधा

इग्रजांनी सातपुड्यातील वाघ संपवले...का ? कशासाठी, तर वाचा सविस्तर ! 

ब्रिटिशांनी वेळोवेळी वाघांना ठार मारल्याच्या नोंदी गॅझेटमध्ये आहेत. त्यानंतर या भागातून विविध कारणांनी हळूहळू वाघांची संख्या कमी होत गेली.

इग्रजांनी सातपुड्यातील वाघ संपवले...का ? कशासाठी, तर वाचा सविस्तर ! 

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदाः अठराव्या शतकात तत्कालीन धुळे जिल्ह्यातील सातपुड्याच्या जंगलात मुख्य वन्यप्राणी म्हणून वाघांची गणना होत होती. सातपुड्याच्या पर्वतराजी आता या वैभवाला मुकले असून, ब्रिटिशांच्या काळात विशेष पथकांची नेमणूक करून अक्षरशः सातपुड्यातील वाघांची कत्तल करण्यात आल्याच्या नोंदी सरकारी गॅझेटमध्ये आहेत. आता नष्ट झालेले जंगल, भक्षक पशूंच्‍या अभावामुळे जंगलातील वाघ उरला केवळ पुस्तकातील चित्रापुरताच. 

सरकारी गॅझेटनुसार १७ व १८ व्या शतकात तत्कालीन धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतराजीत वाघांची संख्या मोठी होती. त्याकाळी सातपुड्याचे जंगल हे अतिशय घनदाट व वाघांना अधिवासासाठी पूरक होते. ब्रिटिश काळात सातपुड्याच्या क्षेत्रात वाघच्या धुमाकुळाने मानव वैतागला होता. मानवाला जीव गमवावा लागल्याचा नोंदी सरकारी गॅझेटमध्ये आहेत. त्यामुळे या काळात वाघांची संख्या कमी करण्यासाठी १८२२ मध्ये ६० वाघांना ठार मारण्यात आले. त्यानंतर सर जेम्स आउटरॅम व त्यांच्यानंतर आलेल्या उत्तराधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतरही या भागात वन्यप्राण्यांच्या विशेषतः वाघांचा धुमाकूळ होता. त्यांना ठार मारण्यासाठी एक खास पोलिसांची तुकडी नेमण्यात आली होती. १८६२ पासून ब्रिटिशांनी पोलिस अधीक्षक मेजर ओ. प्रोबिन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर वाघाच्या संहार केला व त्यानंतरही ब्रिटिशांनी वेळोवेळी वाघांना ठार मारल्याच्या नोंदी गॅझेटमध्ये आहेत. त्यानंतर या भागातून विविध कारणांनी हळूहळू वाघांची संख्या कमी होत गेली आणि आताच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सातपुड्याच्या पर्वतराजीतून तर वाघ हा रुबाबदार प्राणी कधीच लुप्त झाला आहे. 

गॅझेटमधील महत्त्वपूर्ण बाबी : 
- १८२२ मध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ५०० माणसे व २० हजार पशू मारले गेलेत, त्यामुळे १८२२ च्या मे, जून व जुलै या तीन महिन्यांत ६० वाघांना ठार मारण्यात आले. 
- १८७४-७९ या कालावधीत वाघांनी १६ माणसे व ३९१ जनावरांची शिकार केली, त्यामुळे या कालावधीत दर वर्षी सरासरी १५ वाघांची कत्तल करण्यात आली होती. 
- पूर्वी देशातील एकूण वाघाच्या जवळपास नऊ टक्के वाघ खानदेशच्या सातपुड्याच्या भागात आढळत होते. 


सर्वांनी सामूहिक प्रयत्न करीत वाघांच्या नष्ट झालेल्या वस्तीस्थानांची पुनर्स्थापना केली, तर सातपुड्याच्या या क्षेत्रात पुन्हा हा रुबाबदार, राजेशाही प्राणी परतू शकतो. वाघाला वाचवणे म्हणजे जैविक बहुविधता वाचविणे व अंतिमतः मानवाला वाचविणे होय. 
-प्रा. ए. टी. वाघ, पक्षी, प्राणी अभ्यासक 
 
संपादन- भूषण श्रीखंडे