प्रशासक जाणार; मिळणार हक्‍काचे कारभारी

सम्राट महाजन
Monday, 30 November 2020

मतदार याद्या प्रसिद्ध होत असून निवडणूक कार्यक्रम लवकरच घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे; त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून संयम राखून ठेवलेल्या इच्छुकांना देखील आता निवडणुकीचे वेध लागले आहे.

तळोदा (नंदुरबार) : कोरोनामुळे लांबलेल्या ग्राम पंचायतींच्‍या निवडणुका घेण्याचा हालचाली प्रशासकीय स्तरांवर गतिमान झाल्या आहेत. तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींवरील प्रशासक राज संपुष्टात येत ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा सरपंच लवकरच लाभण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी मतदार याद्या प्रसिद्ध होत असून निवडणूक कार्यक्रम लवकरच घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे; त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून संयम राखून ठेवलेल्या इच्छुकांना देखील आता निवडणुकीचे वेध लागले आहे.

कोरोनाचा संसर्ग होण्याची व पसरण्याची शक्यता लक्षात घेता राज्य शासनाने मार्च ते डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील सर्व ग्राम पंचायतीचा निवडणुका पुढे ढकलल्या होत्या, त्यानुसार तळोदयातील 7 ग्राम पंचायतीच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता मात्र या काळात मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणूका घेण्याचा हालचाली प्रशासकीय स्तरांवर गतिमान झाल्या असून महसूल प्रशासन देखील त्यादृष्टीने तयारीला लागले आहे. 

सात ग्रामपंचायतींवर प्रशासक
निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून यासाठी दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे तळोदा तालुक्यातील बंधारा, राणीपुर, पाडळपुर, नर्मदानगर, रोझवा पुनर्वसन, रेवानगर व सरदारनगर या ग्राम पंचायतीवरील प्रशासक राज संपुष्टात येत तिथे लवकरच आपला हक्काचा सरपंच नागरिकांना लाभणार आहे.

इच्छुकांना लागले निवडणुकीचे वेध
तळोदा तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींसाठी डिसेंबर महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची व जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात निवडणुका होत मतदान होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या 7 ग्राम पंचायतींचा सरपंच बनण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या व कोरोनामुळे गेल्या 6 महिन्यांपासून संयम राखून ठेवलेल्या इच्छुकांना आता मात्र निवडणुकीचे वेध लागले असून त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे.

मतदार यादी कार्यक्रम
– मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे.
– मंगळवार दिनांक 1 डिसेंबर ते सोमवार 7 डिसेंबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी.
– गुरुवार दिनांक 10 डिसेंबर रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda sevan gram panchayat election and new leader