शाळेचे बॉसच पॉझिटीव्‍ह; आता मुलांना पाठवायचे कसे

फुंदीलाल माळी
Sunday, 22 November 2020

कोरोनाच्‍या पार्श्वभुमीवर बंद असलेल्‍या शाळा सोमवारपासून (ता. 23) शाळा सुरू होणार असल्याचे नियोजन करण्यात आले. त्‍यानुसार शिक्षकांची आरोग्य तपासणी तालुकास्तरावर करण्यात येत आहे.

तळोदा (धुळे) : तळोदा तालुक्यातील दोन मुख्याध्यापकांसह आठ शिक्षक पॉझिटिव आढळले असून शाळा सुरू होण्याच्या सुमारास शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याने पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठवावे की नाही यावर संभ्रम निर्माण झाला आहे. 
कोरोनाच्‍या पार्श्वभुमीवर बंद असलेल्‍या शाळा सोमवारपासून (ता. 23) शाळा सुरू होणार असल्याचे नियोजन करण्यात आले. त्‍यानुसार शिक्षकांची आरोग्य तपासणी तालुकास्तरावर करण्यात येत आहे. तीन दिवसात तळोदा तालुक्यातील 507 शिक्षकांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये तालुक्यातील एकूण आठ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले असून त्यात दोन मुख्याध्यापकांचा समावेश आहे.

५३३ जणांची तपासणी
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालुका आरोग्य विभागाने युद्धपातळीवर 507 शिक्षकांसह तीन दिवसात एकूण 533 जणांची कोरोना चाचणी केली. यासाठी आमलाड येथील विलगीकरण कक्ष असलेल्या वस्तीगृहात तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विशाल चौधरी, डॉ. सुमित वाणी, डॉ. सागर महाजन आदी जणांची टीम काम करत आहे.

संभ्रम कायम
शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. दुसरीकडे पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये; असे निर्देश आहेत. पालकांचे संमती पत्र घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये; अशा सूचना देण्यात आल्याने पालकही संमती पत्र कसे द्यावे या संभ्रमात आहेत. त्या आधीच शाळा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी काळजी घेण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन शिक्षण सुरू होऊ शकले नव्हते.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda teacher corona test and head master positive