रस्ते नाही म्हणून ॲम्बूलन्स नाही, त्यामुळे ‘बांबूलन्स' ने जावे लागते रुग्णांना !  

सम्राट महाजन
Saturday, 29 August 2020

स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तरीनंतर देखील रस्त्याअभावी एखाद्याला दवाखान्यात नेण्यासाठी बाबूलन्सचा आधार घ्यावा लागतो हे फारच विदारक व दुर्दैवी आहे.

तळोदा : एकीकडे डिजिटल भारत - कनेक्टिंग महाराष्ट्राचे ढोल वाजवण्यात येत आहेत तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तरीनंतर देखील तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील नयामाळ गावामध्ये रस्त्याची सोय नसल्याने एका आजारी महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी चक्क बांबूलन्सचा आधार घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने दुर्गम भागातील नागरिकांना देखील प्राथमिक सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. 

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक गाव - पाड्यांमध्ये आजही प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव असून ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी अथवा इतर मोठ्या गावांमध्ये यायला साधा रस्ताही नाही. एरवी कसेबसे ग्रामस्थ हे त्यातून मार्ग काढतात. मात्र कोणी गंभीर आजारी पडले तर त्याला तालुक्याचा अथवा दवाखाना असलेल्या सपाटीच्या ठिकाणी नेतांना नागरिकांना मोठ्या मुश्किलीला सामोरे जावे लागते, अशीच घटना आज तळोदा तालुक्यात घडली. तालुक्यातील नयामाळ येथील निमलाबाई फोज्या वळवी ( वय ४५ ) ही महिला आजारी पडली होती, मात्र स्थानिक पातळीवर उपचाराची सोय नसल्यामुळे सदर महिलेला अक्कलकुवा येथे उपचारासाठी नेण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. मात्र रस्ता नसल्यामुळे नयामाळ पर्यंत गाडी येऊ शकत नाही, त्यामुळे आजारी निमलाबाईला बांबूलन्सने नेण्यात आले. कुटुंबातील सदस्यांनी व परिसरातील ग्रामस्थांनी निमलाबाईला लाकडी दांडीला बांधून ( बांबूलन्सने ) १५ की. मी. ची डोंगराळ भागातील पायपीट करीत इच्छागव्हान पर्यंत आणले. तेथून आजारी निमलाबाईला पुढे गाडीने अक्कलकुवा येथे उपचारासाठी आणण्यात आले. स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तरीनंतर देखील रस्त्याअभावी एखाद्याला दवाखान्यात नेण्यासाठी बाबूलन्सचा आधार घ्यावा लागतो हे फारच विदारक व दुर्दैवी आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने दुर्गम भागातील नागरिकांना देखील प्राथमिक सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष दिले पाहिजे.... 

तळोदा तालुक्यातील नयामाळ गावात रस्ता नसल्याने, आजारी पेशंटला लाकडी दांडीला बांधून तब्बल १५ की. मी. ची पायपीट करीत इच्छागव्हाणला आणण्यात आले व तेथून पुढे गाडीतून उपचारासाठी नेण्यात आले. ही अतिशय भयावह व दुःखद अशी घटना आहे. या गावापर्यत तसेच इतर ठिकाणी ताबोडतोब रस्ते करण्याची मागणी लोक संघर्ष मोर्चा तर्फ करण्यात येत आहे. 
 प्रतिभाताई शिंदे, प्रणेत्या, लोक संघर्ष मोर्चा. 

अनेकदा दुःखद परिस्थितींना सामोरे जावे लागते  
सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक नागरिक आजही प्राथमिक सुविधांपासून कोसो दूर आहेत. रस्त्याअभावी अनेकदा आजारी व्यक्तींना बांबूलन्सचा आधार घेऊन कित्येक किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करीत दवाखान्यात दाखल करण्यात येते. यात योग्यवेळी उपचार न मिळाल्याने अनेकदा दुःखद, कठीण परिस्थितींना कुटूंबाला सामोरे जावे लागते....  

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda Tribals in remote areas of talodya are suffering due to lack of medical facilities and roads