कुऱ्हाडीचा दांडा मारताच तो खाली कोसळला; हॅण्डपंपावर पाणी भरण्याचा वाद

फुंदीलाल माळी
Sunday, 29 November 2020

गणेश बुधावल गावात शेजारी- शेजारी राहणारे महेंद्र शिड्या पाडवी व महिपाल रामजी वळवी यांच्या घराजवळ सरकारी सामायिक हँडपंप आहे. या हँडपंपवर पाणी भरण्यासाठी काटेरी गेट उघडून आत जावे लागते.

तळोदा (नंदुरबार) : हॅन्ड पंपवरून पाणी भरण्याच्या वादातून बुधावल (ता. तळोदा) येथे झालेल्या मारहाणीत अक्षय पाडवी (वय 20) या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.
गणेश बुधावल गावात शेजारी- शेजारी राहणारे महेंद्र शिड्या पाडवी व महिपाल रामजी वळवी यांच्या घराजवळ सरकारी सामायिक हँडपंप आहे. या हँडपंपवर पाणी भरण्यासाठी काटेरी गेट उघडून आत जावे लागते. 28 नोव्हेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास महेंद्र शिड्या पाडवी हे पाणी भरण्यासाठी हॅन्डपंपावर गेले होते. त्यावेळी महिपाल रामजी वळवी यांच्या मुलगा अजय वळवी याने काटेरी गेट बंद करून घेतले होते. त्यावेळी पाणी भरण्यासाठी आवाज होतो व तुम्ही रात्रभर झोपू देत नाही; असे म्हणत अजय वळवी याने पाणी भरण्यास विरोध केला. यात महेंद्र पाडवी व महिपाल वळवी तसेच अजय वळवी यांच्यात बाचाबाची झाली. हे पाहून महेंद्र पाडवी यांचा मुलगा अक्षय पाडवी हा तेथे आला. अजय वळवी यास माझ्या वडिलांसोबत का भांडण करतो; असे विचारले असता अजयने कुऱ्हाडीने मारून टाकण्याची धमकी दिली असता त्‍यांच्यात हाथापाई झाली.

पोटात मारला कुऱ्हाडीचा दांडा
अजय वळवी याने हातातील कुऱ्हाडीच्या उलटा दांडा अक्षय यास पोटात मारला. अक्षयचा पोटात ठोसा मारला गेल्याने अक्षय खाली पडला. तो हालचाल करत नाही; हे समजल्यावर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मदतीने त्‍यास खासगी वाहनाने गावातील पोलीस पाटील मंगलसिंग पाडवी, सरपंच मंगलसिंग पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अक्षय यास मृत घोषित केले. पोलीस पाटील मंगलसिंग पाडवी यांनी घटना कळवल्याबरोबर रात्रीच पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, अजय पवार, रविंद्र पाडवी, रवी माळी घटनास्थळी पोहोचले. तपास करून आरोपी महिपाल वळवी व अजय वळवी यांना सकाळी सहा वाजता अटक करण्यात आली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda water pump two family suit and boy murder