धुळे महापालिकेत वर्षानुवर्ष ठाण मांडणाऱ्यांची होणार उचलबांगडी 

निखील सुर्यवंशी
Monday, 31 August 2020

महापालिकेत वर्षानुवर्ष अशा बदल्या होत नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांची त्या-त्या विभागात मक्तेदारी, एकाधिकारशाही झाली आहे.

धुळे  : महापालिकेत एकाच विभागात, एकाच टेबलावर वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची उचलबांगडी निश्‍चित आहे. स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महापालिकेतील नगररचना विभागापासून याची सुरवात होणार आहे. इतर विभागांमध्ये बदलीची प्रक्रिया वेगात सुरू आहे. 

महापालिकेच्या भूखंडाची परस्पर विक्री प्रकरणासह नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत सभापती बैसाणे यांच्यासह काही सदस्यांनी नगररचना विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे वाभाडे काढले. काही विशिष्ट कामांमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना इंटरेस्ट असल्याचा व चिरीमिरी घेतल्याशिवाय ही मंडळी कामच करत नसल्याचा आरोप सभेत झाला होता. याच सभेत सभापती श्री. बैसाणे यांनी नगररचना विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसांत खातेअंतर्गत बदल्या करण्याचा आदेश दिला होता. 
सभापती श्री. बैसाणे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या आस्थापना विभागाने नगररचना विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या इतर विभागांमध्ये बदलीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले. हा प्रस्ताव बहुतेक सोमवारी (ता. ३१) महापालिका आयुक्तांकडे सादर होण्याची शक्यता आहे. 

इतर विभागांतही कार्यवाही 
नगररचना विभागानिमित्त महापालिकेतील इतर विविध विभागांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्‍न पुढे आला असून, त्याचीही प्रक्रिया आस्थापना विभागाकडून सुरू आहे. एका विभागात साधारण तीन वर्ष काम केल्यानंतर संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्याची बदली होणे अपेक्षित असते. मात्र, महापालिकेत वर्षानुवर्ष अशा बदल्या होत नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांची त्या-त्या विभागात मक्तेदारी, एकाधिकारशाही झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांची कामे सहजपणे मार्गी लागत नाहीत. परिणामी, महापालिकेची बदनामी होते. ठाण मांडून बसलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याची बदली झाली, तर संबंधित कर्मचारी अस्वस्थ असतो. बदलीनंतरही पूर्वीच्याच विभागात कसे परत जाता येईल, यासाठी त्याची धडपड सुरू असते. एखाद्या पदाधिकारी, अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने त्याची ही इच्छा काही दिवसांतच पूर्णही होते. हे प्रकारही आता बंद होणे गरजेचे आहे. 

आस्थापना विभागाकडून कार्यवाही सुरू 
विविध विभागांत प्रभारी म्हणून काम सांभाळूनही अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळालेले नाही. अशा काही अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्याचा विषयही स्थायी समितीत चर्चिला गेला. त्या अनुषंगानेही काही अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबरच इतरही कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्याबाबत आस्थापना विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. 
 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news There will be transfers of officers working in the same department for many years in Dhule Municipal Corporation