माजी मंत्री डॉ. सतीश पाटीलांची विधानपरिषदेवर निवड म्हणजे राष्ट्रवादीला संजीवनी 

संजय पाटील
रविवार, 3 मे 2020

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी वाताहत झालेली असून, राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉ. सतिश पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करावी अशी मागणी सर्वच स्तरातून होतांना दिसत आहे.

पारोळा : जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करावी; अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पारोळा तालुक्‍याच्यावतीने तालुकाध्यक्ष संतोष महाजन यांनी केली आहे. 
एकेकाळी जळगाव जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार म्हणून डॉ. सतिश पाटील निवडून आले होते. त्यांनी भाजप सरकारला जिल्ह्यातुन प्रखर विरोध करत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. जिल्ह्यातील भाजपचे नेते गिरीश महाजन, एकनाथ खडसे यांच्याशी कडवा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पहिला. अनेकदा त्यांनी गिरणेचे पाणी अंजनी व बोरी धरणात सोडण्यासाठी उपोषण, रास्तारोको, आंदोलन केली. डॉ. सतीश पाटील यांची लढवय्ये व आक्रमक आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम केले. 

नदीजोड प्रकल्पासाठी चांगले काम 
एरंडोल, पारोळा, भडगाव मतदारसंघात त्यांनी अनेक विधायक कामे मार्गी लावली. जिल्ह्यात नदीजोड प्रकल्पाचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघ पाण्याखाली कशा पद्धतीने येईल याचे चांगले नियोजन केले होते. त्याचा चांगला फायदा येथील शेतकऱ्यांना झाला. गिरणेचे पाणी शिरसमणी भोंडण पाटचारी, नगाव बाहुटे धरण, अंजनी चारी, सारवे चारीमधून अनेक गावांना त्याचा फायदा झाला. गत काळातही मतदारसंघात त्यांनी पंचवीस कोटीच्या रस्त्याची कामे सुरू केल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. 

म्हणून विधानपरिषदेवर निवड हवी 
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी वाताहत झालेली असून, राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉ. सतिश पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करावी अशी मागणी सर्वच स्तरातून होतांना दिसत आहे. तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी डॉ सतीश पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ही मागणी पारोळा तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता, परिषदेच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस, सर्वमहाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, जिल्हासरचिटनिस मनोराज पाटील, बालु पाटील, रोहिदास पाटील, योगेश रोकडे, नंदलाल माळी, धिरज महाजन, संदीप पाटील व समता सैनिक यांनी केली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhan parishad election rashtrawadi congress satish patil