रोजगारासाठी परराज्‍यात मजूरांचे स्थलांतर, त्यामुळे गाव, पाडे झाले ओस 

योगिराज ईशी 
Tuesday, 6 October 2020

शेतकऱ्यांना बाहेर गावाहून मजूर आयात करावे लागत आहेत, तर स्थानिक मजूर रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर होत असल्याने शेतकऱ्यांना मजुरांसाठी भटकंती करावी लागत आहे.

कळंबू: दसरा, दिवाळी आधीच ग्रामीण भागातील आदिवासी मजूर रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर झाल्याने ग्रामीण भागातील गावे, पाडे, ओस पडू लागली आहेत. 

दरवर्षी दसरा, दिवाळी नंतर बहुतेक ग्रामीण भागातील आदिवासी मजूर वर्ग रोजगारानिमित्त बारामती, सांगली, कोल्हापूर, स्वराष्ट, गुजरात राज्यात व इतर ठिकाणी स्थलांतर होतात, परंतु यावर्षी बहुतांश मजूर दसरा, दिवाळी आदी स्थलांतर झाल्याने अनेक गावे, पाड्यात शुकशुकाट असल्याने लहान मोठे व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. एकीकडे कपास, ज्वारी, बाजरी, सोयाबीन काढणीसाठी गावाकडे मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बाहेर गावाहून मजूर आयात करावे लागत आहेत, तर स्थानिक मजूर रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर होत असल्याने शेतकऱ्यांना मजुरांसाठी भटकंती करावी लागत आहे. स्थानिक पातळीवर रोजगार मर्यादित वेळे पुरता उपलब्ध होत असल्याने मजूर वर्ग परराज्यात स्थलांतरित करीत असल्याचे घर सांभाळण्यासाठी गावी असलेल्या मंडळींनी सांगितले. यावर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने तसेच ज्यांच्या घरी सांभाळणारे कोणी वाली नाही. असे बहुतेक विद्यार्थी आपल्या पाल्यासोबत परराज्यात गेल्याने शाळा व ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहून त्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. 

मजूर स्‍थलांतर रोखणे आवाहन 
गेल्या सहा महिन्यापासून कोरोनामुळे आर्थिक मंदी, तर आता गावपातळीवर मजूर स्थलांतर यामुळे गावातील किराणा दुकान, पिठाची गिरणी, पानटपरी आदी विविध व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. एकीकडे शासन मजूर स्थलांतर रोखण्यासाठी व ऑनलाइन शिक्षणासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर स्थानिक ठिकाणी विविध कामे उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी करीत असतात. मात्र याचा काहीही उपयोग होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news villages and villages are getting wet due to migration of laborers