esakal | वाघाडीतील स्फोटाने हाहाकार! 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

वाघाडीतील स्फोटाने हाहाकार! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर ः शिरपूर- शहादा रस्त्यालगत वाघाडी (ता. शिरपूर) शिवारातील रुमित केमिसिंथ प्रा.लि. या रसायननिर्मिती कारखान्यात आज सकाळी नऊला झालेल्या भीषण स्फोटात 14 जण ठार, तर सुमारे 60 जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी अद्यापही काही मृतदेह लोखंडी सांगाड्याखाली अडकल्याची शक्‍यता आहे. राज्य आपत्ती नियंत्रण दलासह पोलिस प्रशासनातर्फे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 
या दुर्घटनेतील 14 पैकी 11 जणांची ओळख पटली असून, अन्य तीन मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने त्यांची ओळख पटू शकली नव्हती. मृतदेहांचा शोधही उशिरापर्यंत सुरू होता. 37 जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 17 जणांना अधिक उपचारांसाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. याशिवाय येथील पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातूनही काही रुग्णांना धुळे येथे रवाना केले आहे. 
वाघाडी- बाळदे रस्त्यावर रुमित केमिसिंथ हा रसायननिर्मितीचा कारखाना आहे. औषधनिर्मिती उद्योगात लागणाऱ्या रसायनांचे उत्पादन तेथे केले जाते. आज सकाळी नऊला रात्रपाळी संपवून कामगार बाहेर जाण्यासाठी "चेक आउट' करीत होते, तर दिवसपाळीचे कामगार आत येत होते. त्याच वेळी कारखान्यातील एका संयंत्रातून धूर बाहेर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच तेथील सुरक्षारक्षकांनी आरडाओरड करीत कामगारांना कारखान्याबाहेर पडण्याचे आवाहन केले. मात्र, काही सेकंदांतच या संयत्राचा भीषण स्फोट झाला. संयंत्राजवळ असलेल्या कामगारांना काही कळण्याच्या आतच ते बाहेर फेकले गेले. घटनास्थळी कामगारांच्या तुटलेल्या अवयवांचा खच पडला. जखमींच्या किंकाळ्यांनी वातावरण भरून गेले. 
या स्फोटाचा हादरा घटनास्थळापासून दहा किलोमीटर परिसरात जाणवला. त्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या वाहनांनी वाघाडीकडे धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून युवकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना दुचाकीवरून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसीलदार सुदाम महाजन, पोलिस उपअधीक्षक अनिल माने, निरीक्षक शिवाजी बुधवंत आदी वाघाडीला पोहोचले. त्यांनी वाहतूक नियमन करून जखमींच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिकांना वाट करून दिली. 

मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख 
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मृतांप्रती ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्या. पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, पोलिस महानिरीक्षक छोरिंग दोर्जे, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. 

ओळख पटलेल्या मृतांची नावे 
पूनमचंद प्रल्हाद गुजर (वय 24), उज्जैनसिंह पद्मसिंह राजपूत (43, दोघे रा. अर्थे, ता. शिरपूर), मुकेश गोपाल माळी (रा. जनतानगर, शिरपूर), किशोर मुरलीधर येवलेकर (रा. भरतसिंहनगर, शिरपूर), पिनाबाई जितेंद्र पावरा (38), सुपीबाई रमेश पावरा (25), रोशनी जितेंद्र पावरा (13, रा. नासकी, ता. पानसेमल, मध्य प्रदेश), पंजाबाई विशाल पावरा (29, रा. वकवाड ता. शिरपूर), मनोज सजन कोळी (42, रा. वाघाडी, ता. शिरपूर), प्रिया सुभाष पावरा (6 वर्षे, रा. पानसेमल, मध्य प्रदेश), प्रमिला रमेश पावरा (रा. जामन्यापाडा, ता. शिरपूर). 

स्फोटातील जखमींची नावे 
गणेश विश्वास पाटील (43), रोहित आत्माराम पाटील (38), चतुर शिवदास माळी (26), योगेश शांताराम माळी (33), मनोज कोळी (40), विकास नामदेव वहाणे (28), सुनील वना कोळी (40), अमिताबी मणियार (35), महेंद्र रमेश कोळी (35), भिवन पावरा (40), सुनीता सुरेश पावरा (28), अलिमा हकीम मणियार (35), राहुल अशोक पाटील (19), योगेश रवींद्र पाटील (27), केवा शहाणे (32), शरद धनराज पावरा (22), गब्बरसिंग पावरा (41), शाहरुख युसूफ तेली (27), धनराज दिनकर पावरा (24), सुभाष रमेश पावरा (14), चिंताबाई सुभाष पावरा (19, सर्व रा. वाघाडी), मनोहर प्रताप भिल (26, रा. नवे भामपूर), नरेश रामसिंग पावरा (26), ममता प्रकाश पावरा, जागृती प्रकाश पावरा (तिन्ही रा. जामन्यापाडा), रोहित रामदास पावरा (21, रा. हातेडपाडा), यास्मीन मलिक (45), तौसिफ मलिक (45), शहनाझ मलिक (40), महेंद्र रमेश कोळी (35, सर्व रा. वाघाडी), रवींद्र नानाभाऊ राजपूत (24), सुभाष राणासिंह राजपूत (33), अनिल रघुनाथ कोळी (27), शब्बीर दाऊदी मलिक (40, सर्व रा. जातोडा), रोहित आत्माराम जाधव (33, रा. वाघाडी), राजू मगन राठोड (30, रा. अर्थे), सुनील नथा माळी (56, रा. वाघाडी), कोमलसिंह आनंदसिंह राजपूत (40, अर्थे). 

इंदिरा गांधी रुग्णालयातील जखमी 
अभिजित पालीवाल (24, नाशिक), रवींद्र नानाभाऊ राजपूत (24, जातोडा), मोहन कैलास दाभाडे (22, वाघाडी), अण्णा परदेशी पावरा (जुना चांदसैली), विशाल सिंगला पावरा (वकवाड), अनिसाबी आकील मणियार (40, रा.वाघाडी), राहुल अशोक पाटील (20, वाघाडी), सुप्रिया जयसिंग पावरा (आठ वर्ष, रा. टेंभे), विनोद संतोष कोळी (35, रा. वाघाडी), महेंद्र गणेश शिंदे. 
 

loading image
go to top