माठात केली लघुशंका.. आणि कारागृहात... झाली फ्रि स्टाईल ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020


या प्रकाराची चौकशी केली असता बंदिवान सलीम खा ऊर्फ सल्या हा बॅरेक क्रमांक 9 मध्ये होता. तो, अतिमद्य सेवनाच्या (अल्कोहोलिक्‍स) आजाराने ग्रस्त आहे. इतर कैद्यांच्या भांड्यामध्ये रात्री उठून लघुशंका करायचा, अंघोळीच्या वेळेस पाण्यात थुंकून जायचा तसेच बॅरेकमध्ये कोणालाही पाहून बडबड करत असल्याची माहिती समोर आली आहे. 
ए. आर. गोसावी 
जिल्हा कारागृह अधीक्षक 

जळगाव : शहर पोलिसांनी वॉरंटवर अटक केलेल्या संशयिताला जिल्हा कारागृहाच्या बॅरेक क्रमांक 9 मध्ये बेदम मारहाण झाल्याची घटना पहाटे अडीचच्या सुमारास घडली. गेल्या तीन-चार दिवसांत सोबतच्या कैद्यांना हैराण करुन सोडल्यानंतर रविवारी रात्री बॅरेकमधील माठात लघुशंका केल्याने दोघांनी त्याला बेदम झोडपले. वेळीच कारागृह कर्मचारी आल्याने पुढील अनर्थ टळला. उपचारार्थ दाखल वॉर्डात या कैद्याने गोंधळ घातल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. 

मुक्ताईनगर पोलिस ठाण्याअंतर्गत वॉरंटवरील संशयित म्हणून अटक केलेल्या सुनील जगन्नाथ तारु (वय 40) याचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना जिल्हा कारागृहात रविवारी (ता. 8) पहाटे सलीम खॉं कादर खॉं पटवे ऊर्फ सल्या (वय-30) या वॉरंटमध्ये कारागृहात आलेल्या बंदिवानाला दोन कैद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बॅरेक क्रमांक 9 मध्ये रविवारी पहाटे अडीचला घडली. यावेळी ड्युटीवरील अरविंद प्रकाश पाटील, अरविंद म्हस्के अशा दोघांनी वेळीच धाव घेत मारहाण करणारे बंदिवान निखिल कैलास पाटील व अमित सुदर्शन चौधरी याच्या तावडीतून सोडवले. जखमी अवस्थेत सलीम खा याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, कैदी वॉर्डात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सल्यावर हद्दपारीचाही प्रस्ताव पारीत झाला असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. 

पोलिसगार्ड आले मेटाकुटीस 
जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये सलीम ऊर्फ सल्या याला दाखल करण्यात आले असून, त्याने सकाळपासून गार्ड ड्यूटीवर असलेल्या पोलिस, नर्सेस, डॉक्‍टरांना शिवीगाळ करुन अक्षरश: उपद्रव माजवला होता. रुग्णालयात दारु भेटत नसल्याने डोक्‍यावर परिणाम झाल्यासारखा जोर-जोरात आरोळ्या मारुन संपूर्ण वॉर्ड त्याने डोक्‍यावर घेतल्याने पोलिस कर्मचारी सोमवारी रात्रीपर्यंत मेटाकुटीस आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nwes jalgaon jail Two inmates brutally beaten