जळगावाकरांची या दिवशी होणार सावली गायब 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

दुपारी बाराला सूर्य आपल्या डोक्‍यावर येतो. पण, रोज तसे घडत नाही. असा योग वर्षातून फक्त दोनच वेळा येतो. सौर घड्याळ (सनडायल)नुसार बाराला व हातातील घड्याळानुसार (भारतीय प्रमाण वेळ) बारा वाजून काही मिनिटांनी डोक्‍यावर येतो आणि आपली सावली पायापाशी पडते.

जळगाव : सूर्य आणि पृथ्वीच्या भ्रमणातील अनेक भौगोलिक घटना आपल्याला दैनंदिन जीवनात अनुभवायला मिळतात. अशाच "शून्य सावली दिवसा'चा (झिरो शॅडो डे) अनुभव 25 व 26 मेस घेता येणार आहे. "लॉकडाउन'मुळे हा क्षण "फेसबुक लाइव्ह'च्या माध्यमातून अनुभवण्याची संधी खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी उपलब्ध करून दिली आहे. 

आपण नेहमी म्हणतो, की रोज दुपारी बाराला सूर्य आपल्या डोक्‍यावर येतो. पण, रोज तसे घडत नाही. असा योग वर्षातून फक्त दोनच वेळा येतो. सौर घड्याळ (सनडायल)नुसार बाराला व हातातील घड्याळानुसार (भारतीय प्रमाण वेळ) बारा वाजून काही मिनिटांनी डोक्‍यावर येतो आणि आपली सावली पायापाशी पडते. निसर्गाच्या या अद्‌भुत घटनेला "शून्य सावली दिवस' (झिरो शडो डे) असे म्हणतात. खरे बघितले तर संपूर्ण दिवस शून्य सावली नसते. बारा वाजून काही मिनिटांची जी वेळ असते, त्या क्षणाला आपली सावली आपल्या पायापाशी पडते. म्हणून याला "शून्य सावली दिवस' असे म्हणण्याऐवजी शून्य सावलीचा क्षण असलेला दिवस असे म्हणणे योग्य राहील. 

"फेसबुक'वर "लाइव्ह' अनुभव 
उत्तरायणाच्या काळात उत्तर दिशेकडे हळूहळू सरकताना सूर्य एका अक्षांशावर साधारण दोन दिवस असतो. त्यामुळे शून्य सावलीचे प्रात्यक्षिक 25 आणि 26 मे असे दोन दिवस करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी "लॉकडाउन'मुळे कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्‍य नाही. त्यामुळे माझ्या "फेसबुक'च्या माध्यमातून या कार्यक्रमाचे "लाइव्ह' प्रक्षेपण आम्ही करणार आहोत. सर्व खगोलप्रेमींनी या भौगोलिक घटनेचा अनुभव घ्यावा. 
- अमोघ जोशी, खगोल अभ्यासक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratih news jalgaon zero shadow day 25 may