‘कोरोना’वर मेटॅलिक आयन  पद्धतीने उपचार करणे शक्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

‘कोरोना’वर भारतात उपलब्ध असणाऱ्या उपचारपद्धतीचा सौ. राजपूत यांनी अभ्यास केला. त्यांनी इंटरनॅशनल इंटरडिसिप्लिनरी रिसर्च जर्नलकडे पाठविलेला प्रबंध जर्नलच्या १२ मेच्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. 

नंदुरबार : ‘कोरोना’विषयी नंदुरबारची कन्या सौ. इंदिरा जितेंद्रसिंग (पिंटू) राजपूत यांचा शोधप्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. भारतातच उपलब्ध असणाऱ्या मान्यताप्राप्त औषधांनी ‘कोरोना’ आटोक्यात येऊ शकतो, असा दावा प्रबंधात करण्यात आला आहे. हा प्रबंध रसायनशास्त्राच्या धातू धनभारीत (मेटॅलिक आयन) पद्धतीवर प्रकाश टाकणारा आहे. रसायनशास्त्राच्या अंगाने आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एकमेव प्रबंध आहे. 

‘कोरोना’वर भारतात उपलब्ध असणाऱ्या उपचारपद्धतीचा सौ. राजपूत यांनी अभ्यास केला. त्यांनी इंटरनॅशनल इंटरडिसिप्लिनरी रिसर्च जर्नलकडे पाठविलेला प्रबंध जर्नलच्या १२ मेच्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. 
सध्या भारतात ‘कोरोना’वर मात करण्यासाठी फक्त प्रतिविषाणू औषधाद्वारे (अँटिव्हायरल) उपचार करण्यात येतात. ‘कोरोना’ विषाणूच्या मेदाच्या कवचावर काही विशिष्ट औषधांची अभिक्रिया करून मेदाचे कवच तोडता येऊ शकत असल्याचा अभ्यास सादर करण्यात आला असून, कवच भेदल्यानंतर प्रथिने शिल्लक राहतात. या प्रथिनांवर अँटिव्हायरल औषधे परिणामकारक ठरू शकतील. ‘कोरोना’च्या मेदाचे कवच भेदण्यासाठी जी औषधे वापरली जात आहेत, त्यासोबत प्रतिविषाणू औषधे (अँटिव्हायरल ड्रग) वापरली गेली, तर ‘कोरोना’वर फायदेशीर ठरू शकत असल्याचा अभ्यास प्रबंधातून सादर करण्यात आला आहे. 

प्रबंधातील महत्त्वाचा मुद्दा 
या प्रबंधातून तीन प्रकारच्या उपचारपद्धती सुचविण्यात आल्या आहेत. त्यात कोणत्याही नवीन औषधांचा पर्याय सुचविण्यात आलेला नाही, तर प्रतिजैविकसोबत द्यावयाच्या औषधांचा संयोग कसा असावा, यावर भर देण्यात आला आहे. 

सौ. राजपूत यांनी अल्पकाळाच्या अभ्यासातून हे संशोधन सादर केले आहे. त्यांचे शिक्षण एम. एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री/डीएमएलटी) झाले असून, ‘नंददर्शन’चे संस्थापक संपादक (स्व.) विठ्ठलसिंग राजपूत यांच्या कन्या, तर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्रसिंग (पिंटू) राजपूत यांच्या त्या पत्नी आहेत. त्या जिल्हा परिषदेंतर्गत ढेकवद (ता. नंदुरबार) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marthi news nandurbar Corona can be treated with metallic ions