सटाण्याच्या पाणीप्रश्नी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांनी एकत्रित काम करावे

satana.jpg
satana.jpg

सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्रित काम करावे असा एकमुखी ठराव येथे आयोजित महत्वाच्या बैठकीत शहरवासीयांनी केला. यामुळे शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न सुरू झाले आहेत. 

सटाणा शहराचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालला आहे. इतिहासात कधी नव्हे अशा भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना शहरवासीयांच्या नळांना सलग ४० दिवस पाण्याचा थेंबही आलेला नव्हता. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने मंजूर केलेल्या पुनंद पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र धरणातून थेट जलवाहिनीने पाणी वाहून नेण्यास कळवण तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे निवडणूक काळात योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. दरम्यान, शहराच्या पाणीप्रश्नाला राजकीय वळण लागले. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी येत्या ३१ मे पर्यंत योजनेचे काम सुरू न झाल्यास पालिका प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. तर माजी आमदार संजय चव्हाण व नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पाणीप्रश्नावरून पत्रकबाजी करत एकमेकांविरोधात आरोप–प्रत्यारोप सुरू केले होते. नगराध्यक्ष व माजी आमदारांमध्ये सुरू असलेली ही जुगलबंदी शहरवासीयांसाठी चेष्ठेचा विषय ठरत असताना नागरिकांचा संताप वाढविणारी देखील होती. त्यामुळे येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरात पुनंद पाणीपुरवठा योजनेसंदर्भात विचारविनिमय करून तोडगा काढण्यासाठी माजी आमदार, नगराध्यक्ष, विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.

‘पाणी’ या महत्वाच्या प्रश्नावर संपूर्ण गावातील नागरिक गट-तट, पक्ष विसरून एकत्रित आले आहेत. माजी आमदार संजय चव्हाण व नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी मतभेद व श्रेयवाद बाजूला ठेवून एकदिलाने शासन दरबारी मंजूर असलेल्या पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. दोन्ही नेत्यांनी एकत्रितरित्या या योजनेसाठी लढा देण्याचे मान्य केले. 


यावेळी बोलताना माजी आमदार संजय चव्हाण म्हणाले,''कळवण तालुक्यातील अर्जुन सागर धरणातून सटाणा शहरासाठी मंजूर असलेल्या पुनंद पाणीपुरवठा योजनेसाठी अवघे १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. धरणात उर्वरित १३०० दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी कायम उपलब्ध राहणार असल्याने परिसरातील शेती सिंचनावर याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. त्यामुळे आम्हास पाणी कमी पडेल हा कळवणकरांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे.''
इगतपुरी तालुक्यात असलेल्या भातसा व तानसा तसेच वैतरणा धरणातील सर्व पाणी थेट जलवाहिनीद्वारे शेकडो किलोमीटरवर मुंबईला जाऊ शकते, मग अर्जुन सागर धरणातील आरक्षित पाणी ४८ किलोमीटरवर असलेल्या सटाण्याला का मिळू नये, असा प्रश्नही  चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. 

नगराध्यक्ष सुनील मोरे म्हणाले, ''सटाणा शहराचा पाणीप्रश्न सोडविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. कळवणकरांना विश्वासात घेत त्यांच्याशी समन्वय साधून आचारसंहिता संपल्यावर अवघ्या पंधरा दिवसांच्या आत पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावण्यात येईल, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.  पुढील २५ वर्षांचा विचार करता शहरासाठी पूरक पाणीपुरवठा योजना व्हावी, अशा विविध सूचना बैठकीत करण्यात आल्या. के. यू. सोनवणे यांनी साठवण बंधाऱ्यासाठी आराई शिवारात असलेली दोनशे एकर गावठाणची जमीन उपयुक्त असल्याचे सांगितले. तर सध्या गिरणी कामगारांच्या ताब्यात असलेल्या सूतगिरणीच्या ९२ एकर जमीनीचा वापरही साठवण बंधाऱ्यासाठी होऊ शकेल अशी सूचना गिरणी कामगार नेते अण्णासाहेब सोनवणे यांनी यावेळी केली.

आरम नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या चार बंधार्‍यांची निर्मिती करावी अशी मागणी जे. के. सोनवणे यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत माजी पाणीपुरवठा सभापती व नगरसेवक राहुल पाटील, नगरसेवक मनोहर देवरे, प्रा. सि.डी. सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, माजी पाणीपुरवठा सभापती अरविंद सोनवणे, ज.ल.पाटील, रमेश देवरे, रमेश सोनवणे आदींनी सहभाग घेतला. बैठकीस देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, नगरसेवक दिपक पाकळे, महेश देवरे, राकेश खैरणार, डॉ.विद्या सोनवणे, किशोर कदम, दत्तू बैताडे, मधुकर सोनवणे, प्रदीप सोनवणे, राजनसिंह चौधरी, नितिन सोनवणे, रोहित शिंदे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. किशोर कदम यांनी सूत्रसंचालन केले.

''संत शिरोमणी देवमामलेदार मंदिरामागील के.टी.वेअर बंधारा येत्या वर्षभराच्या आत बांधून पूर्ण होणार आहे. त्याच्या निर्मितीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असून त्यातील ४० लक्ष रुपये शासन, ८० लक्ष रुपयांचा निधी नगरपालिका प्रशासन देणार असून ८० लक्ष रुपये देवस्थान ट्रस्टने खर्च करण्याची जबाबदारी उचलली आहे.''
- भालचंद्र बागड, अध्यक्ष, देवमामलेदार देवस्थान ट्रस्ट 

''पाणीटंचाई निवारणार्थ शहराजवळील सुकडनाला धरणात आरम व हत्ती नदीचे पुरपाणी टाकण्यासाठीचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी देवस्थान ट्रस्टने उचलली असून त्यामुळे शहरातील नववसाहतीच्या नागरिकांना पाणीटंचाईबाबत दिलासा मिळणार आहे.''
- रमेश देवरे, विश्वस्त, देवमामलेदार देवस्थान ट्रस्ट 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com