गिरणा परिसरातील महत्त्वाची बातमी; मेहुणबारेतील शवविच्छेदन गृहाचा प्रश्न मार्गी...वाचा

दीपक कच्छवा
रविवार, 17 मे 2020

मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयात इतर सर्व सुविधा उपलब्ध असताना केवळ शवविच्छेदनच होत नव्हते.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) :  येथील ग्रामीण रुग्णालयात इतर सर्व सुविधा उपलब्ध असताना केवळ शवविच्छेदनच होत नव्हते. तब्बल बारा वर्षांपासून ‘शो पीस’ ठरलेल्या शवविच्छेदनगृहासंदर्भात ‘सकाळ’मध्ये वस्तुनिष्ठ वृत्त झळकल्यानंतर त्याची आरोग्य विभागाने गंभीरपणे दखल घेतली. यापुढे मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी दिली. त्याला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. केवळ ‘सकाळ’मुळेच हा प्रश्‍न मार्गी लागल्याने मेहुणबारेकरांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयाचा परिसरातील सुमारे ५९ खेड्यांशी संपर्क येतो. या ठिकाणी इतर सर्व सुविधा सध्या उपलब्ध असल्या तरी शवविच्छेदन मात्र होत नव्हते. त्यामुळे शवविच्छेदनासाठी चाळीसगावलाच जावे लागत होते. वास्तविक, या ठिकाणी शवविच्छेदनगृह बारा वर्षांपूर्वीच बांधून तयार होते. मात्र, ते अद्यापपर्यंत वापरात न आल्याने ‘शो पीस’ ठरले होते. विशेष म्हणजे, यंदा या शवविच्छेदनगृहाच्या दुरुस्तीवर खर्च देखील झालेला होता. मात्र, ते वापरात नसल्याने हा खर्च वाया जाण्याची शक्यता होती. या संदर्भात ‘सकाळ’मध्ये १५ मेच्या अंकात चाळीसगाव पानावर ‘मेहुणबारेतील शवविच्छेदनगृह ठरले ‘शो पीस’ या मथळ्याखाली वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते. याशिवाय बहाळ- कळमडू गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य शशिकांत साळुंखे यांनी देखील राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत हा विषय नेऊन लवकरात लवकर मार्गी लावू, अशी ग्वाही दिली होती.

शवविच्छेदनगृहाची पाहणी

जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण यांनी मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनगृहाची पाहणी करण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा मेहुणबारे रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांना सांगितले. त्यानुसार, डॉ. बाविस्कर यांनी आज मेहुणबारेत येऊन पाहणी केली. शवविच्छेदन खोलीची साफसफाई करून या ठिकाणी पाणी व विजेची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. बाविस्कर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शवविच्छेदनगृहाच्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीतर्फे दोन वर्षांपूर्वी पाठपुरावा केला होता. अखेर ‘सकाळ’ने हा प्रश्न मांडून तडीस नेला. यामुळे मेहुणबारेसह परिसरातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने मी खास करून ‘सकाळ’ला धन्यवाद देते.
- संघमित्रा चव्हाण, सरपंच ः मेहुणबारे (ता. चाळीसगाव)

शवविच्छेदनगृह कार्यान्वित करण्यासाठी आम्ही आदेश दिलेले आहेत. यापुढे मेहुणबारे भागातील सर्व मृतदेहांचे विच्छेदन करण्याच्या सूचना मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या आहेत. सूचनेचे पालन केले नाही तर संबंधितांवर कारवाई करू.
- नागोजीराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक ः जळगाव

मेहुणबारे रुग्णालयात विच्छेदन करण्यासाठी प्रशिक्षण
घेतलेला कर्मचारी उपलब्ध आहे. या संदर्भात मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना देखील पत्र दिले आहे. यामुळे आता या ठिकाणी शवविच्छेदन करणे सोयीचे होईल.
- डॉ. बी. पी. बाविस्कर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mehunbare's autopsy house problem is solved