बापरे! उष्णतेमुळे दिवसात आटले तब्बल 40 हजार लिटर दूध

संतोष विंचू
Friday, 31 May 2019

- येवल्यातील शीतकरण प्रकल्प - 40
- दूध संकलन केंद्र - 40

येवला : जिकडे पहावे तिकडे निव्वळ भकास..हिरवा चारा नाहीच पण आता पाणीही मिळेनासे झाल्याने तालुक्यातील दुग्धव्यवसायाला मोठा झटका बसत आहे. अनेक पशुपालक चारा-पाणी व सरकी विकत घेऊन जनावरे जगवत आहे, असे असले तरी आवाक्याबाहेर गेलेल्या उष्णतेमुळे तालुक्यातील दूध संकलनात दिवसाला ३५ ते ४०  हजार लिटरने घट झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात पावसाच्या पाण्यावार शेती अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. गायींचे संगोपन करून शेतकरी लाखो लिटर दूध विक्री करत असून, त्यातच शेजारील कोपरगाव तालुक्यात दुध डेअऱ्या असल्याने व्यवसायाला मोठा आधार मिळतो. तालुक्यात सुमारे १२५ दुध शीतकरण व संकलन केंद्रातून दिवसाला ९५ हजार ते १ लाख लिटर दूध संकलन होते. मात्र आज मोठी  घरघर यंदा व्यवसायाला लागली आहे. 

पशुपालकांनी जपून ठेवलेला चारा संपला असून शहरासह अंदरसुल,पाटोदा,नगरसुल आदी भागात दिंडोरी,चाळीसगाव, कोपरगाव, निफाड तालुक्यातून ऊस विक्रीला येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी तीन हजार रुपये दराने मिळणारा ऊस आज साडेचार हजार रुपये टन दराने मिळत आहे. मकाचा चारा गायब झाला असून, उन्हाळी मका ज्यांच्याकडे आहे तेही सुमारे दोन हजार रुपये दराने विक्री करत आहे. गंभीर म्हणजे वाढत्या मागणीमुळे आणि टंचाईमुळे सरकी ढेपेला शेतकऱ्यांकडून मागणी वाढल्याने दीड महिन्यापूर्वी अकराशे रुपये दर असलेली ढेप आज साडेसोळाशे रुपयांना मिळत असल्याने पशुपालक देखील हवालदिल झाले आहेत.

पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाण्याचा टँकरही विकत घेण्याची वेळ पशुपालनवर आली आहे. या सगळ्यासह वाढत्या उष्णतेमुळे जनावरांचे संगोपन कढीन झालेच पण दूधही आटले असल्याचे पशुपालक सांगतात. जेथे तालुक्यातून सुमारे एक लाख लिटर दूध संकलन होते तेथेच आज हा आकडा ६० ते ६५ हजार लिटरवर मागे आला असल्याचे सांगितले जाते.

“माझ्याकडे १२ गाई असून मागील चार महिन्यात त्यांच्यासाठी चारा,सरकी व पाण्यावर माझे वीस हजारावर खर्च झाले आहेत.आज तर आठवड्याला दोन टन ऊस विकत घेण्याची वेळ येत आहे. दुधाला डेअरीत भाव नसल्याने एवढे उत्पन्न मिळत नाही परंतु लक्ष्मी असल्याने ती जगविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे.” 

- गणेश क्षीरसागर, उंदिरवाडी

“आमच्या भागात जनावरे जगवण्याचा संघर्ष व्यक्त करता येत नाही. इतकी कठीण स्थिती आहे. हिरवा चारा मिळत नसून ऊस,सरकी मिळते पण दर आवाक्याबाहेर गेलेत. दुधाला मागणी वाढली असतांना चारा-पाणी टंचाई व प्रचंड उष्णतेमुळे दुध संकलनात ३० ते ३५ टक्के घट झाली आहे. माझ्याच केंद्रावर सात ते आठ हजार लिटर दूध संकलन घटले आहे.”

- सचिन कळमकर, संचालक,जनार्दन शीतकरण केंद्र

आकडे बोलतात...
*येवल्यातील शीतकरण प्रकल्प - ४०
*दुध संकलन केंद्र - ४५
*रोजचे दुध संकलन - ९५ हजार ते १ लाख  लिटर 
*आजमितीस होणारे संकलन - ६० ते ६५ हजार लिटर
*विकत मिळणाऱ्या उसाचा दर - ४५०० रु.टन 
*संकलित दुधाचा पतंजली,एस.आर.थोरात,गोदावरी,प्रभात,अमूल-आनंद,पंचमल आदि डेअरीना पुरवठा होतो.
*येवल्यातील दुध गुजराथ-सुरत,संगमनेर,श्रीरामपूर,सिन्नर,राहाता,कोपरगाव आदि भागात पोहोचते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk Production Reduced by 40 Liters in Yevla