प्रलंबित दोन अहवालांमुळे गूढ वाढले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

हिरे महाविद्यालयात "कोरोना टेस्ट लॅब' सुरू झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील नमुने तपासणीसाठी येत आहेत. रात्री आठनंतरही तपासणीचे काम सुरूच होते.

धुळे : धुळे शहरासह जळगाव, नाशिक येथून "कोरोना'सदृश लक्षणे असलेल्या नमुन्यांची येथील चक्करबर्डीतील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात आज तपासणी झाली. त्यात धुळे जिल्ह्यातील 16 पैकी 14 अहवाल "निगेटिव्ह' असून उर्वरित दोन अहवाल प्रतीक्षेतच आहेत. येथे आजअखेर 132 जणांची तपासणी झाली. 
 
हिरे महाविद्यालयात "कोरोना टेस्ट लॅब' सुरू झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील नमुने तपासणीसाठी येत आहेत. रात्री आठनंतरही तपासणीचे काम सुरूच होते. अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. मृदुला द्रविड यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. 
 
सव्वाशेवर जणांची तपासणी 
गेल्या दोन दिवसांत तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांमध्ये वाढ झाली. कालपर्यंत तपासणी झालेल्यांची संख्या 118 होती. दिवसभरात आज धुळे जिल्ह्यातील 24 जणांचे नमुने आले. उशिरापर्यंत 16 जणांची तपासणी झाली. त्यातील 14 अहवाल "निगेटिव्ह' आहेत. अन्य दोन अहवाल प्रलंबित आहेत. काल आणि आजचे प्रत्येकी एक असे दोन अहवाल प्रलंबित आहेत. आज अखेर तपासणी संख्या 132 झाली आहे. 
 
"निजामुद्दीन'चे 15 "सिव्हिल'ला 
नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन भागातील तबलिगीच्या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातून 15 जण सहभागी झाले. त्यात धुळे शहरातील बारा, तर साक्री तालुक्‍यातील तिघांचा समावेश आहे. त्यांना ताब्यात घेत नमुने घेण्यात आली. त्यांचे अहवाल "निगेटिव्ह' आहेत. संबंधितांना साक्री रोडवरील "सिव्हिल'मध्ये "क्वारंटाइन' करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mmarathi news dhule hire medical collage corona testing two report pending