
Family Court : कौटुंबिक न्यायालयात बालकाचा वाढदिवस; वडिलांसोबत साजरा!
धुळे : येथील कौटुंबिक (Family) न्यायालयात सुरू असलेल्या एका खावटी प्रकरणात आईच्या ताब्यात असलेल्या मुलाचा वाढदिवस वडिलांनी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश देवेंद्र उपाध्ये यांच्या
परवानगीने आणि समुपदेशक अनुराधा खरात यांच्या सहकार्याने केक कापून साजरा केला. (mother custody child birthday celebration in court with father in family court dhule news)
दिवसेंदिवस वाढते पती-पत्नीचे कलह, तसेच कौटुंबिक व सामाजिक पातळीवर ते न मिटविता पक्षकार थेट न्यायालयात धाव घेतात. यात अशा पालकांच्या मुलांचे भवितव्य धोक्यात येत असते. मुले आईकडे असतील तर वडिलांच्या छत्रछायेपासून वंचित असतात, याउलट आईबाबत घडत असते.
येथील कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या अशाच एका खावटी प्रकरणात जाब देणाऱ्या व्यक्तीने मुलाचा वाढदिवस मला साजरा करायचा आहे, अशी न्यायालयास विनंती केली. ती मान्य झाल्याने मुलाचा वाढदिवस असलेल्या दिवशी खावटी प्रकरण न्यायालयात कामकाजासाठी ठेवण्यात आले.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
खावटी प्रकरणातील पक्षकाराला दोन मुलगे असून, एक चार, तर दुसरा सहा वर्षांचा आहे. दोन्ही मुले अर्जदार आईकडे आहेत. मुलाचा वाढदिवस केक कापून साजरा व्हावा, अशी इच्छा वडिलांची होती.
त्यानुसार सोमवारी (ता. १०) दुपारी दोनला कौटुंबिक न्यायालयाच्या हॉलमध्ये न्या. देवेंद्र उपाध्ये यांच्या परवानगीने आणि समुपदेशक अनुराधा खरात यांच्या सहकार्याने आई, वडील, आजी, आजोबांनी वकील वर्ग, पक्षकार, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला.
मुलाचा वाढदिवस आपल्या उपस्थितीत साजरा करण्यात आल्याचा वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. याबद्दल संबंधित पक्षकाराने कौटुंबिक न्यायालयाचे आभार मानले.