esakal | हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना दमबाजी

बोलून बातमी शोधा

farmer
हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना दमबाजी
sakal_logo
By
जगन्नाथ पाटील : सकाळ वृत्तसेवा

कापडणे : येथे हरभरा व गहू आणून तुम्हांला कोणता एवढा मोठा फायदा होणार आहे. पेमेंटसाठी महिनाभर थांबावे लागेल. हाच माल तुम्ही बाजारात न्या. तुम्हांला तिथे रोख पेमेंट मिळेल. येथे स्वतःला कशाला त्रास करून घेतात, असा अनाहूत सल्ला अवधान येथील हमीभाव खरेदी केंद्रावर काही कर्मचारी शेतकऱ्यांना देऊन भंडावून सोडत आहेत. व्यापाऱ्याचा माल आल्यावर त्यांच्याकडून अर्ध्या तासात खरेदी करून मोकळे केले जात आहे. खऱ्या शेतकऱ्यांना त्रास देणारे धोरण हमीभाव खरेदी केंद्रावर सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

धुळे शहरातील अवधान एमआयडीसी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा आणि गहू नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिथे माल घेऊन गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचे सहकार्य कर्मचारी करीत नाहीत. विशेष म्हणजे हमाली आणि इतर मजुरी मध्ये सुद्धा लुबाडणूक सुरू आहे. दहा-पंधरा क्विंटल मोजण्यासाठी तीन-चार तास थांबावे लागत आहे. तथाकथित व्यापारी शेतकरी बनून तिथे हरभरा व गहू आणत आहे. त्यांची गाडी आल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांची कळी फुलते तासभरातच गाडीचे मोजणी करून ते कर्मचारी मोकळे होतात. एवढे सहकार्य व्यापाऱ्यांना तिथे केले जात आहे.

सफाईची मजुरी अन्यायकारक

खरेदी केंद्रावर हरभरा व गहू कितीही चांगल्या प्रतीचा नेला असता, तिथे साफसफाई करण्याची क्विंटल मागे दहा रुपयांची मजुरी लावली जात आहे. प्रत्यक्षात साफसफाई केली जात नाही. एमआयडीसी केंद्रावर विविध प्रकारची लुबाडणूक सुरू आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी धुळे तालुक्यातून होत आहे.

अवधान येथील हमीभाव खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांकडून नोंदणी केलेला माल खरेदी करण्यापेक्षा फुकटचा सल्ला केंद्र झाले आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना चक्क बाजारात माल विकण्याचा सज्जड दम दिला जात आहे. हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे याकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

-भटू पाटील, शेतकरी, माजी ग्रामपंचायत सदस्य