अवैध वाळू वाहतुकीत  रुग्णवाहिका अडकली...तासभर गरोदर महिला विव्हळली ! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

नेहमी बेशिस्त वाहतूकदार मुजोरी करीत असतात. त्याचा फटका अनेकांना बसत असतो. यावर कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा,

नंदुरबार  : महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैध वाळू वाहतुकीमुळे तासभर 108 रुग्णवाहिका अडकून पडल्याने गरोदर महिलेला मोठ्या यातनांना सामोरे जावे लागले. दोन्ही बाजूंनी वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या मधोमध रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. बेशिस्त वाहतूकदारांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

नक्की वाचा : सलून दुकाने उघडू द्या; अन्यथा आर्थिक मदत द्या! 
 

तळोदा तालुक्‍यातील रेवानगर येथील रेखा पावरा ही आठ महिन्यांची गरोदर आहेत. त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असल्याने व पुढील उपचारार्थ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. आज सकाळी अकराच्या सुमारास रुग्णवाहिका तळोदा रुग्णालयातून रुग्ण महिलेस घेऊन निघाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैध वाळू वाहतूकदारांची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास अडचण झाली. 

रुग्णवाहिकेचे चालक दिनेश पाटील यांनी वेळोवेळी सायरन वाजवत रस्ता मोकळा करा. रुग्णवाहिकेत रुग्ण उपचारासाठी पुढे जायचे आहे, असे आवाहन करूनही मुजोर बेशिस्त वाहतूकदारांनी वाट दाखविली नाही. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर काही उपयोग होत नसल्याने शेवटी चालक पाटील यांनी रस्त्यावर उतरून वाहतूकदारांना विनवण्या केल्या, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. रुग्णवाहिका आडमार्गाने जाऊ द्या, असा खोचक सल्ला रुग्णवाहिकेचे चालक पाटील यांना बेशिस्त वाहतूकदारांनी दिला. 

 आर्वजून पहा : परीक्षेच्या गोंधळाने विद्यार्थी संभ्रमात, परीक्षा घेणे योग्यच शिक्षणतज्ज्ञांचे मत
 

तासभर रुग्णवाहिका अडकून पडल्याने गरोदर रुग्ण महिलेस त्रास होत होता, तेव्हा रुग्णवाहिकेत सोबत आलेले डॉ. चेतन रावताळे यांनी तत्काळ तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, वाहतूक कोंडी असलेला रस्ता गुजरात हद्दीत येतोय, म्हणून हात झटकले. या रस्त्यावर नेहमी बेशिस्त वाहतूकदार मुजोरी करीत असतात. त्याचा फटका अनेकांना बसत असतो. यावर कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते गोपी पावरा यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrathi news nandurbar Ambulance stuck in illegal sand transport