धुळ्यात सभापती, उपसभापती फायनल !

रमाकांत घोडराज
Wednesday, 17 February 2021

सभापती, उपसभापतिपदांच्या निवडीसाठी १८ फेब्रुवारीला सकाळी दहाला महापालिकेत विशेष सभा होईल.

धुळे ः महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी अपेक्षेनुसार भाजपचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. या पदासाठी एकमेव त्यांचाच अर्ज असल्याने स्थायीच्या सभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार हे आजच निश्‍चित झाले. याशिवाय महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी वंदना थोरात, उपसभापतिपदासाठी शकुंतला जाधव यांनीही प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. त्यामुळे तीनही पदांसाठी आता केवळ औपचारिकता बाकी आहे. 

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी शेवटची मुदत होती. सभापतिपदासाठी प्रभाग क्रमांक १५ (क) चे भाजपचे नगरसेवक जाधव यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केला. नगरसचिव मनोज वाघ यांनी ते स्वीकारले. महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक नागसेन बोरसे, हर्षकुमार रेलन, नगरसेविका वंदना भामरे आदी उपस्थित होते. श्री. जाधव यांच्या अर्जावर नगरसेवक बन्सीलाल जाधव सूचक, तर नगरसेवक नागसेन बोरसे अनुमोदक आहेत. 

थोरात, जाधव यांचे अर्ज 
महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी प्रभाग क्रमांक ११ (क) च्या भाजपच्या नगरसेविका वंदना थोरात यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर नगरसेविका लक्ष्मी बागुल सूचक, तर नगरसेविका वंदना भामरे अनुमोदक आहेत. तसेच महिला बालकल्याण समिती उपसभापतिपदासाठी प्रभाग क्रमांक-१४ (अ) च्या भाजपच्या नगरसेविका शकुंतला जाधव यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर नगरसेविका कशिश उदासी या सूचक तर नगरसेविका निंबाबाई भिल या अनुमोदक आहेत. श्रीमती थोरात व श्रीमती जाधव यांचे अर्ज सादर करतांनाही सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

गुरुवारी शिक्कामोर्तब 
सभापती, उपसभापतिपदांच्या निवडीसाठी १८ फेब्रुवारीला सकाळी दहाला महापालिकेत विशेष सभा होईल. जिल्हाधिकारी संजय यादव पीठासीन अधिकारी असतील. तीनही पदांसाठी प्रत्येकी एक उमेदवारांचे अर्ज दाखल असल्याने निवड निश्‍चित झाली आहे. सभेत त्यावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होईल. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muncipal corpration marathi news dhule standing committee chairman deputy chairman selection process