esakal | राज्यपालांसमोर भाजपच्या लोकप्रतिनिधींचे ‘पॉलिटिकल रडगाणे' ! 
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांसमोर भाजपच्या लोकप्रतिनिधींचे ‘पॉलिटिकल रडगाणे' ! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजनेसाठी २४०० कोटी रुपये दिले.

राज्यपालांसमोर भाजपच्या लोकप्रतिनिधींचे ‘पॉलिटिकल रडगाणे' ! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः महापालिकेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याहस्ते कोरोना योद्ध्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमातही जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी ‘पॉलिटीकल' रडगाणे गायल्याचे दिसून आले. विशेषतः विविध कामांसाठी राज्य शासनाकडून निधीला ‘ब्रेक' लागल्याचा त्यांचा सूर होता. लोकप्रतिनिधींचे हे रडगाणे राज्यपाल कोश्‍यारी यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी आपल्या भाषणात ‘फंड' नही मिला तो ‘रिफंड' हो जायेगा, असे म्हणत कार्यरत राहण्याचा सल्ला दिला. 

आवश्य वाचा- साहित्य-संस्कृतीच्या धनापुढे टाटा, बिर्ला, अदानी फिके..! 
 

महापालिकेत राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांच्या झालेल्या सत्कारावेळी भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, एमआयएमचे आमदार फारुक शाह आणि भाजपचे महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते. आमदार रावल व डॉ. भामरे यांनीही मनोगत मांडले. 
आमदार रावल यांनी ‘वर्स्ट धुळे ते फर्स्ट धुळे‘ अशी कोरोनावर मात करण्याची जिल्ह्याची प्रगती असल्याचे सांगितले. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, की धुळ्याची ओळख मागास जिल्हा अशी होती. आता मात्र आम्ही नंबर वनमध्ये आलो आहोत. श्री. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी धुळे शहराला ५०० कोटी रुपये देण्याचा शब्द दिला होता आणि ते त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजनेसाठी २४०० कोटी रुपये दिले. या योजनेचे काम सुरू आहे. खानदेश एक्सप्रेस, एमआयडीसी आदींचाही त्यांनी उल्लेख केला. 
 

फंडला ब्रेक लागल्याची तक्रार 
खासदार डॉ. भामरे यांनीही माजी मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधान मोदी यांचे गुणगान गायले. मंत्रालयाच्या गॅझेटमध्ये कायमस्वरूपी दुष्काळी, अशी धुळे जिल्ह्याची ओळख होती. पंतप्रधान मोदींनी सुलवाडे- जामफळ योजनेसाठी अडीच हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे दोनशे गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. राज्यात भाजपच्या सत्ताकाळात जिल्ह्यासाठी निधीचा फ्लो होता, आता मात्र फंड येत नसल्याचे म्हणत यात राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी विनंती डॉ. भामरे यांनी केली. मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादन सुरू असल्याचे व पंतप्रधान मोदी, मंत्री नितीन गडकरी, मंत्री पीयूष गोयल यांच्यामुळे हे काम मार्गी लागल्याचा त्यांचा सूर होता. महापौर सोनार यांनीही राज्यात भाजपच्या सत्ताकाळात शहरासाठी मंजूर विविध योजनांचा पाढा वाचला. 

आवर्जून वाचा- तरसोद-चिखली टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात  ​
 

राज्यपालांचा सल्ला अन्‌... 
राज्यपाल कोश्‍यारी यांनी या लोकप्रतिनिधींच्या भाषणाचा रोख लक्षात घेत ‘फंड' नही मिला तो ‘रिफंड' हो जायेगा असे म्हणत काम करत राहा, असा सल्ला दिला. नंतर मात्र, राज्यपाल कोश्‍यारी यांनीही सबका साथ- सबका विकास- सबका विश्‍वास या भाजपच्या स्लोगनचा आधार घेत पंतप्रधान मोदी यांच्यासारखे नेतृत्व देशाला मिळाले आहे, असे म्हणत मोदींचे कौतुक केले. राज्यपाल कोश्‍यारी यांच्या ‘रिफंड हो जायेगा‘ या वाक्यातही सत्तांतराबाबत काही राजकीय संदर्भ दडला आहे का याचा विविध पातळीवर शोध सुरू झाला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे