धुळ्यात व्यापाऱ्यांवर ‘एलबीटी‘चे भूत पुन्हा अवतरले 

रमाकांत घोडराज
Saturday, 23 January 2021

ज्या व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत तसेच काही व्यापारी संस्थांनी निर्धारणा आदेशावर हरकती अर्ज दाखल केले आहेत.

धुळे ः स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीच्या अनुषंगाने एलबीटी अदा करणे, विवरणपत्र व आवश्‍यक कागदपत्र जमा करणे, कर निर्धारणा तपासणीची कार्यवाही महापालिकेने पुन्हा सुरू केली आहे. ही प्रक्रिया संबंधित व्यापाऱ्यांनी पूर्ण करून घ्यावी. अन्यथा, नियमानुसार व्यापारी शास्तीस पात्र राहतील व उपलब्ध माहितीच्या आधारे एलबीटी कर निर्धारणा केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. 

आवश्य वाचा- अफगाणिस्तानमध्ये घबाड सापडले आणि गुरूजी मोहात  अडकले; मग काय, जे व्हायचे होते तेच झाले ! 
महापालिका क्षेत्रात ६ जुलै २०१३ ते ३१ जुलै २०१५ दरम्यान एलबीटी कर लागू होता. या कालावधीत ज्या व्यापाऱ्यांना एलबीटी कर लागू होता. त्यांच्या विवरणपत्राच्या पडताळणीचे (कर निर्धारणाचे) एलबीटी वसुलीचे काम महापालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या कर निर्धारण प्रक्रियेसाठी व्यापारी अल्प स्वरूपात हजर झाले. 

निर्धारण करावे 
नोंदणीकृत व नोंदणी न करता व्यापार केलेल्या सर्व व्यावसायिकांनी एलबीटी लागू असलेल्या कालावधीतील थकीत कर भरून, विवरण पत्र व त्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्र महापालिकेच्या जुन्या जुन्या इमारतीमधील स्थानिक संस्था कर विभागात जमा करावीत. यापूर्वी महापालिकेने ज्या व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत तसेच काही व्यापारी संस्थांनी निर्धारणा आदेशावर हरकती अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी आवश्‍यक कागदपत्रासह हजर होऊन निर्धारणा करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त शेख यांनी केले आहे. 

वाचा- शहरात कंपाउंडर तर गावात डॉक्टर बनून थाटला व्यवसाय;  छापा पडला आणि सत्य समोर आले !  
 

जबाबदारी व्यापाऱ्यांची 
जे व्यापारी एलबीटी भरून विवरणपत्र व त्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत अथवा निर्धारणा तपासणीस हजर राहणार नाहीत ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ स्थानिक संस्था कर नियम २०१० ) मधील तरतुदीनुसार शास्तीस पात्र राहतील. तसेच त्यांच्या उपलब्ध माहितीच्या आधारे स्थानिक संस्था कराची निर्धारणा करण्यात येईल. याबाबतची संपूर्ण 
जबाबदारी संबंधित व्यापाऱ्यांची राहील, असेही आयुक्त शेख यांनी म्हटले आहे. 

विषय संपलेला नाहीच 
नऊ वर्षापूर्वी लागू झालेला व बंद होऊन पाच वर्ष झालेल्या एलबीटीची प्रक्रिया अद्यापही संपलेली नाही. मध्यंतरी अनेकदा व्यापारी व लोकप्रतिनिधींमध्ये बैठका होऊन एलबीटीचा विषय मिटल्याचे चित्र निर्माण केले गेले. मात्र नियमानुसार ही प्रक्रिया संपविणे कुणालाही शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळेच व्यापाऱ्यांना कार्यवाही पूर्ण करण्याबाबत नोटिसा दिल्या जातात, आवाहन केले जाते. त्याच प्रक्रियेत आता आयुक्त शेख यांनी पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news dhule lbt taxes recovered from traders commissioner decision