
दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसांत झाली नाही, तर तीव्र आंदोलन करू, महापालिकेला टाळे ठोकू, असा इशाराही मनसेने दिला.
धुळे ः वर्षभरापासून देवपूर भागातील जयहिंद हायस्कूल ते जयहिंद महाविद्यालय, वाडीभोकर रोड यांसह परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र, महापालिका या समस्येकडे कानाडोळा करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी जयहिंद चौकात निदर्शने केली. १५ दिवसांत रस्ते दुरुस्त झाले नाहीत, तर महापालिकेला टाळे ठोकू, असा इशाराही मनसेने दिला.
शहरातील देवपूर भागात जयहिंद हायस्कूल ते जयहिंद महाविद्यालय या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शाळा-महाविद्यालयाचा रस्ता असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच महिला, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. नेहरूनगर ते वाडीभोकर रस्ता, तसेच देवपूर भागातील अनेक रहिवासी वस्त्यांमध्ये रस्त्यांची वाईट अवस्था आहे.
रस्त्यांचे काम संथगतीने
काही ठिकाणी दुरुस्तीचे काम संथगतीने होत आहे. अनेक ठिकाणी तर रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्षच आहे. महापालिका मात्र सुस्त असल्याचे मनसेने म्हटले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेप्रश्नी महापालिकेला जागे करण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गुरुवारी जयहिंद चौकात निदर्शने केली. महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यावर महापालिका प्रशासनातर्फे ओव्हरसिअर पी. डी. चव्हाण आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांना मनसेने निवेदन दिले.
अन्यथा टाळे ठोकू
दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसांत झाली नाही, तर तीव्र आंदोलन करू, महापालिकेला टाळे ठोकू, असा इशाराही मनसेने दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख, रस्ते साधनसुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हा संघटक संतोष मिस्तरी, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संदीप जडे, रोहित नेरकर, विष्णू मासाळ, शहर उपाध्यक्ष राजेश दुसाने, अनिल खेमनार, नीलेश गुरव, साहिल खान, अविनाश देवरे, जगदीश गवळी, मदन पाटील, बापू ठाकूर, हरीश जगताप, अक्षय शिंदे, हेमंत हरणे, विजय चौधरी, अमृत पाटील, नरेश हिरे आदींनी हे आंदोलन केले.
संपादन- भूषण श्रीखंडे