धुळ्यात महापालिकेची मोहीम; ५३ हजार बालकांना पोलिओ डोस 

निखील सुर्यवंशी
Monday, 1 February 2021

राज्य सरकारने रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्याचा आदेश दिला. त्यासाठी १७० लसीकरण केंद्र स्थापन झाले.

धुळे ः शहरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ५३ हजार ७३ हजार बालकांना पोलिओ लसीकरण झाले. यात स्थापन १७० लसीकरण केंद्रांव्दारे ही मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी राज्य सरकारने ८० हजार पोलिओ डोसचा पुरवठा झाला होता. 

आवश्य वाचा- अमृत’ पाणीपुरवठा योजनेचे काम ६० दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान 

महापालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्रात आयुक्त अजीज शेख, उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्‌घाटन झाले. स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाणे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्नेहल जाधव, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. पल्लवी रवंदळे, डॉ. योगेश पाटील, डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. 

राज्य सरकारने रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्याचा आदेश दिला. त्यासाठी १७० लसीकरण केंद्र स्थापन झाले. बस स्थानक, रेल्वे स्थानक, बस थांबे, उद्याने, वीटभट्टी, नवीन बांधकामाची ठिकाणे आदी ठिकाणी दहा ट्रान्सीट पथकांची व्यवस्था होती. हॉस्पिटल आणि रस्त्यावरील लाभार्थ्यांसाठी नऊ मोबाईल पथके होती. मोहिमेत ३३ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली. तसेच ५३९ कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले. महापालिकेसह आशा, अंगणवाडी कर्मचारी, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नर्सिंगचे विद्यार्थी, सरोजिनी नर्सिंग महाविद्यालय, जवाहर मेडिकल फाउंडेशन, नंदाई नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी आदींची मदत महापालिका प्रशासनाने घेतली. 
 

घरोघरी लाभ देणार 
मोहिमेच्या दिवशी पोलिओ डोसपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी दोन फेब्रुवारीला घरोघरी लाभ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी १४० कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत असेल. याकामी पालिकेने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न झाले. मोहीमेवेळी रविवारी केंद्रावंर कोविडपासून संरक्षणासाठी सॅनीटायझर, हात धुण्याची व्यवस्था होती. कर्मचाऱ्यांना मास्क पुरविण्यात आले. तसेच ग्लोज देण्यात आले. शारीरिक अंतर पाळून मोहीम यशस्वी करण्यात आली. घरोघरी पोलिओ डोस देताना सॅनीटायझर, मास्क, ग्लोजचा पुरवठा संबंधित कर्मचाऱ्यांना केला जाईल. 

८३ टक्के उद्दिष्ट सफल 
महापालिका प्रशासनाने ६२ हजार ३६३ बालकांना पोलिओ डोस देण्याच्या हाती घेतलेल्या उद्दीष्टापैकी रविवारी शहरात ५३ हजार ७३ बालकांना डोस दिले गेले. हे प्रमाण ८३.६९ टक्के असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. मोरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news dhule polio campaign dose eighty thousand childrenl