आमचे नगरसेवक विकाऊ नाहीत; शेवटच्या सभेत सभापतीची राजकीय फटकेबाजी  

रमाकांत घोडराज
Tuesday, 2 February 2021

नगरसेवकांचीही कामे होत नसतील तर आमदार शाह यांनी १५ नगरसेवकांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यात तथ्य नाही.

धुळे ः भाजपचे १५ नगरसेवक घेऊन यावेत मी त्यांना महापौर करतो या एमआयएमचे आमदार फारुक शाह यांच्या वक्तव्यावरून महापालिकेच्या स्थायी समिती सभेतही थोडी राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. सभापती सुनील बैसाणे यांनी भाजपचे नगरसेवक विकाऊ नाहीत, आमचे नगरसेवक विकत घेण्याची कुणाची औकात नाही असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. 

आवश्य वाचा- प्रवासात वृध्दाची अचानक प्रकृती बिघडली; मग काय, एसटी बस थेट ग्रामीण रुग्णालयात नेली
 

श्री. बैसाणे यांच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या कार्यकाळातील शेवटची स्थायी समितीची सभा  महापालिकेत झाली. या सभेत  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कमलेश देवरे यांनी सभापती श्री. बैसाणे यांच्या कामाचे कौतुक करतांनाच वारंवार तक्रारी करुनही कामे न झाल्याचा मुद्दा तिरकसपणे मांडण्याचा प्रयत्न केला. श्री. देवरे म्हणाले, की आपल्या सभापतिपदाच्या कार्यकाळात आपण भरपूर मेहनत घेतली पण आपल्या मेहनतीची प्रशासनाने किती दखल घेतली याचा विचार केला पाहिजे. विशेषतः देवपूर भागातील भुयारी गटार योजनेच्या तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामावरील उपस्थितीच्या अनुषंगाने तक्रारी करुनही त्या सुटल्या नसल्याच्या मुद्द्य़ाकडे त्यांचा रोख होता. हाच धागा पकडून श्री. देवरे यांनी आपल्याच (भाजप) नगरसेवकांचीही कामे होत नसतील तर आमदार शाह यांनी १५ नगरसेवकांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यात तथ्य तर नाही ना असा प्रश्‍न सभापती श्री. बैसाणे यांना केला. 

आवर्जून वाचा- सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच नवनिर्वाचित सदस्यांची पळवापळवी सुरू  ​
 

कुणाची औकात नाही 
श्री. देवरे यांनी केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सभापती श्री. बैसाणे म्हणाले, की आमदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, आमचे भाजपचे नगरसेवक विकाऊ नाहीत, कुणाच्या खिशात एवढी ताकद नाही, औकात नाही. उलट आमदारांच्या पक्षाचे (एमआयएम) नगरसेवक तरी त्यांच्यासोबत आहेत का असा प्रश्‍न श्री. बैसाणे यांनी केला. दरम्यान, एमआयएमच्या सदस्याकडे संबंधित १५ नगरसेवकांची लिस्ट असल्याची चर्चाही सभेनंतर महापालिकेत रंगली होती. 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news dhule standing committee chairman political criticism