esakal | नंदुरबारमधील शेतकऱ्यांना दर १५ मिनिटांनी हवामानाची मिळणार माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Meteorologist

नंदुरबारमधील शेतकऱ्यांना दर १५ मिनिटांनी हवामानाची मिळणार माहिती

sakal_logo
By
टीम ई सकाळ


तळोदा : भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात स्वयंचलित कृषी (Nandurbar Agricultural Science Center) हवामान यंत्र (Meteorologist) बसविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर १५ मिनिटांनी हवामानाची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) हवामानावर आधारित शेती करणे व शेतीचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. इंडिया मेटेओलॉजी डिपार्टमेंट (आयएमडी)चे जिल्ह्यातील हे पहिलेच स्वयंचलित कृषी हवामान केंद्र असल्याचे सांगितले जात आहे. (nandurbar agricultural science center meteorologist farmer weather information)

हेही वाचा: दुचाकी अपघातात बापलेक अन मायलेकासह पाच जणांचा मृत्यू

भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी मौसम सेवाअंतर्गत डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे जिल्हा कृषी हवामान केंद्र दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. या केंद्रामार्फत जिल्ह्यातील जवळपास आठ ते दहा हजार शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप व इतर माध्यमातून दर मंगळवारी, शुक्रवारी जिल्ह्याचा आणि तालुकानिहाय हवामानाचा अंदाज व कृषी सल्ला देण्यात येतो. मात्र शेतकऱ्यांना अतिसूक्ष्म स्तरावरील माहिती उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे या अडचणी दूर होण्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात स्वयंचलित कृषी हवामान यंत्र बसविले आहे.

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
या स्वयंचलित कृषी हवामान केंद्रात दर १५ मिनिटांनी हवामानाची आकडेवारी संकलित केली जाते. स्वयंचलित हवामान केंद्रांमधून कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, दिशा, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पाऊस, बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचे तापमान आणि जमिनीतील ओलावा या सर्व नोंदी सहजपणे उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. तसेच या केंद्राद्वारे पिकांची पेरणीपासून ते काढणीपर्यंत हवामानाची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे. पिकाच्या वाढीसाठी प्रामुख्याने योग्य तापमानाची गरज असते. त्यात आर्द्रतेचे प्रमाण, ढगाळ हवामान, पावसातील खंड आणि तापमान यावरून शेतकऱ्यांना कीड व रोगांची तीव्रता अभ्यासणे शक्य होणार आहे.

हेही वाचा: जळगाव मनपातील 27 बंडखोर नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस

स्वयंचलित कृषी हवामान केंद्रामुळे तापमान, आर्द्रता, पाऊस, हवेचा वेग, जमिनीतील ओल व तापमान यांची माहिती, तसेच जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत हवामानाचा अंदाज यावर आधारित कृषी सल्ला मिळणार असल्याने नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामान अंदाज व कृषी सल्ला मिळविण्यासाठी ८९९९२२६५६३ या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करावा.
-सचिन फड, कृषी हवामान शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार

loading image