Nandurbar Lok Sabha Result : लेकीला पराभवातून सावरणारे वडिलांचे पत्र! डॉ. गावितांनी लिहिलेल्या पत्राची समाजमाध्यमांवर चर्चा

Nandurbar News : डॉ. हीना गावित यांना खचून न जाता जनसेवेसाठी पुन्हा जोमाने काम करण्याची संधी मिळाल्याचे म्हणत धीर देणारे पत्र वडील म्हणून मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी लिहिले आहे.
Dr. Vijaykumar Gavit & Dr. Heena Gavit
Dr. Vijaykumar Gavit & Dr. Heena Gavitesakal

Nandurbar Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर कन्या डॉ. हीना गावित यांना खचून न जाता जनसेवेसाठी पुन्हा जोमाने काम करण्याची संधी मिळाल्याचे म्हणत धीर देणारे पत्र वडील म्हणून मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी लिहिले आहे. ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. (Nandurbar Lok Sabha Result dr vijaykumar gavit letter to dr heena Gavit)

चि. हीनाताई,

आज हे पत्र तुला लिहीत असताना मनात खूप भावना आहेत. गेल्या दहा वर्षांत तू तुझं निर्माण केलेलं स्वतंत्र अस्तित्व, त्यासाठी घेतलेली मेहनत, तुझा अभ्यासूपणा, नंदुरबारच्या जनतेसाठी तू विचारपूर्वक केलेली कामं, आणि त्यासाठी घेतलेले कष्ट, पाठपुरावा, या सगळ्याचा मी साक्षीदार आहे.

संसदेत तू पहिल्यांदा पाऊल ठेवताना एका सामान्य बापासारखं माझंही काळीज भरून आलं होतं, की माझी ही छोटीशी लेक, एवढ्या मोठ्या संसदेच्या प्रांगणात कशी टिकेल..? इतक्या दिग्गज लोकांमध्ये तिचा कसा निभाव लागेल? पण, तू तुझं कर्तृत्व गेल्या दहा वर्षांत परखड आणि स्पष्टपणे सिद्ध केलं, त्याबद्दल मला तुझा प्रचंड अभिमान आहे.

आयुष्यात अनेक वळणे येतात बेटा, याचा आपण सगळ्यांनी अनेकदा अनुभव घेतला आहे. आपल्या लेकरांचं आयुष्य सरळ आणि सुखी असावं, असं प्रत्येकच आई-वडिलांना वाटतं, पण आयुष्य असं नसतं. प्रत्येक नव्या वळणावर नवी आव्हाने आ वासून उभी असतात...

त्या सगळ्यांना धीराने सामोरं जाणं, आणि अशा खडतर परिस्थितीतूनही वाट काढत यशाची कामना करणं, हेच खऱ्या योद्ध्याचं लक्षण आहे... आणि मला अभिमान आहे, की माझी लेक प्रत्येक आव्हानाला खंबीरपणे, समर्थपणे तोंड देऊन यश संपादन करते. (latest marathi news)

Dr. Vijaykumar Gavit & Dr. Heena Gavit
Nandurbar Lok Sabha Election 2024 Result : डॉ. हीना गावितांच्या पराभवामुळे नंदुरबारचे केंद्रीय मंत्रिपद हुकले!

या लोकसभा निवडणुकीचा निकाल मी एक संधी समजतो, विश्लेषणाची, अवलोकनाची, अभ्यासाची, थोड्या विश्रांतीची आणि गगनभरारी घेण्यासाठी पुन्हा एकदा पंख पसरण्याची... तू याला अपयश न समजता संधी समजूनच या निकालाकडे पाहशील, अशी मला खात्री आहे. शालेय वयापासूनच तू केवळ खेळाडू नव्हतीस, तर खिलाडू वृत्तीचीही होतीस.

त्यामुळेच समोर आलेल्या अनपेक्षित आव्हानाला तू खिलाडू वृत्तीने घेऊन त्यातून मार्ग काढून पुढे जाशील, अशी मला नक्कीच खात्री आहे. तू स्वतः, आपले सगळे कुटुंबीय, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्रपक्ष या साऱ्यांनी घेतलेली मेहनत नंदुरबारचे लोक कधीच विसरणार नाहीत... तुझ्या अभ्यासू वृत्तीचं, मेहनत करण्याच्या तयारीचं आणि धीरोदात्तपणाचं मला कायमच कौतुक असेल बेटा.

‘जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है’

हा आयुष्याचा नियम आहे. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नकोस. नंदुरबारच्या जनतेने तुझ्यावर अमाप प्रेम केलं. त्यांचं प्रेम विसरू नकोस. त्यांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी आणखी काय करता येईल, याचा नेहमीप्रमाणेच विचार कर, आणि स्वल्पविराम घेऊन पुन्हा एकदा रणरागिणीसारखी झुंजायला तयार हो... मी आणि तुझी आई सदैव तुझ्या पाठीशी आहोत.

नेहमीसारखीच सदैव हसत राहा!

तुझेच,

पप्पा

Dr. Vijaykumar Gavit & Dr. Heena Gavit
Eknath Shinde: NDAच्या बैठकीत एकनाथ शिंदेंची हवा; मुख्यमंत्र्यांच्या शेरोशायरीला उपस्थितांची भरभरुन दाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com