पालिका या खड्ड्यावर का बरं मेहरबान 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर डाबा साचतात. त्यातच येथील जी.टी.पाटील महाविद्यालयकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशीच स्थिती आहे. या रस्त्यावर महाविद्यालयाकडील रस्त्यावरून येणारे पाणी, लोकमान्य कॉलनीतून येणारे पाणी, व परिसरातील पावसाचे पाणी या रस्त्याकडे उतार असल्याने व रस्ता तयार करतांना हा रस्ता उंच न करता त्याला खोल ठेवण्यात आला आहे

नंदुरबार : येथील कॉलेजरोड कॉर्नरवर करण्यात आलेला रस्त्यावरील खड्डा जीवघेणा ठरू पाहत आहे. दिवसभरातून महाविद्यालयीन विद्यार्थी व वाहनधारकांना हा खड्डा चुकवितांना जीव मुठीत धरावा लागत आहे. या खड्यामुळे किरकोळ अपघात वाढले आहेत. असे असताना देखील नंदुरबार पालिका रस्त्यावरील खड्ड्यांवर मेहरबान हा आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. 

भौगोलिक परिसथितीचा विचार न करता झालेले रस्ते 
पालिकेतर्फे शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहेत. मात्र रस्त्याचे कामे करतांना भौगोलिक परिसस्थितीचा अजिबात विचार केला गेलेला नाही. त्यामुळे वरून रस्ते गुळगुळीत व चकाचक दिसत असले तरी अनेक भागात रस्त्यांमध्ये लाईन आऊट व्यवस्थित न दिली गेल्या डाबाचे भाग तयार झाले आहेत. तसेच मुख्य रस्ता व गल्ली-बोळामधील रस्त्या यांचा पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्याचा दृष्टीने विचार झालेला नाही. 

पाणी साचून तलावाचे स्वरूप 
पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर डाबा साचतात. त्यातच येथील जी.टी.पाटील महाविद्यालयकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशीच स्थिती आहे. या रस्त्यावर महाविद्यालयाकडील रस्त्यावरून येणारे पाणी, लोकमान्य कॉलनीतून येणारे पाणी, व परिसरातील पावसाचे पाणी या रस्त्याकडे उतार असल्याने व रस्ता तयार करतांना हा रस्ता उंच न करता त्याला खोल ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नाट्यमंदीर ते अंधारे चौक हा रस्ता उंच आहे. त्यामुळे सर्व पावसाळ्यातील पाणी कॉलेजरोड रस्त्याकडे प्रवाहीत होते. मात्र ते पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे सर्व पाणी पूजा ट्रेडर्स समोरून थेट माजी नगरसेवक विलास रघुवंशी यांच्या बंगल्यापर्यंत रस्त्यावर साचते. त्याला पावसाळ्यात तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे या मार्गावून जाणारे त्या परिसरातील रहिवाशींसह आयटीआय चे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापकांनाही उंचउडीचा खेळ खेळत रस्ता पार करावा लागतो. 

पाण्याचा निचरासाठी केला खड्डा 
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्यावर तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी ते साचलेले पाणी निघण्यासाठी पूजा ट्रेडर्ससमोर गेलेल्या भुयारी गटारीच फोडून पाण्याची तात्पुरती निचऱ्याची सोय केली. त्यामुळे या रस्त्यावरील पाणी कमी झाले होते. ती तात्पुरती सोय झाल्यानंतर महिने -दोन महीने उलटले आहे. मात्र पाणी निघण्यासाठी करण्यात आलेला खड्डा मात्र दुर्लक्षितच राहीला आहे. मात्र हा खड्डा जीवघेणा ठरू पाहत आहेत. खड्डा करतांना रस्त्यामधील सळई वर आल्या आहेत. ते तोंड वासून आहेत. त्यातच हा खड्डा मध्यभागी असून येणाऱ्या -जाणाऱ्यांना तो दिसत नाही. जवळ गेल्यावर खड्डा असल्याचे लक्षात येते. तोपर्यंत वाहनाचे खड्ड्यात जाते. रात्री तर अनेकजण येथे पडतात. काही जणांना या सळई लागून जखमी व्हावे लागले आहे. त्यामुळे पालिका या खड्य़ाकडे लक्ष देईल काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nandurbar palika road damage daily accident