नंदूरबारात पैशांच्या वादातून चालल्या तलवारी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

पैशांच्या व्यवहारातून गुरूवारी रात्री वाद होवून दोन गटात दंगल झाली. यात तलवारी व लाठ्याकाठ्या चालल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती.

नंदुरबार: पैशांच्या व्यवहारातून गुरूवारी रात्री वाद होवून दोन गटात दंगल झाली. यात तलवारी व लाठ्याकाठ्या चालल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी वेळीच स्थिती हाताळत शांतता प्रस्थापित केली. या घटनेत सहा जण जखमी तर दोन्ही गटातील महिलांचा विनयभंग केल्याच्या तक्रारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

शहरातील कुरेशी मोहल्ल्यातील शेख हारुण अब्दुल रज्जाक व पप्पू उर्फ फारुख कुरेशी यांच्यात यापूर्वी असलेल्या पैशांच्या व्यवहारावरुन कुरापत काढून पप्पू कुरेशीसह बारा जणांनी शेख हारुन अब्दुल रज्जाक यांना शेख जलील शेख इसाक यांच्या घरात जाऊन मारहाण केली. त्यावेळी सर्वांनी घरात असलेल्या खलील शेख इसाक, रशीद अब्दुल रज्जाक यांना लाकडी दांडक्‍यांनी मारहाण केली. शेख जलील शेख इसाक यांना तलवारीने मारुन दुखापत केली. शेख हारुण रज्जाक याचा वहिनीचा विनयभंग करुन त्यांना मारहाण करण्यात आली. घराचा मुख्य दरवाजा तोडून घरातील सामानाचे नुकसान केल्याची फिर्याद शेख हारुण अब्दुल रज्जाक यांनी दिली आहे. तर दुसऱ्या गटाकडून पप्पू कुरेशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार शेख हारुन अब्दुल रज्जाक यास नळ कनेक्‍शन घेऊ न दिल्याचा राग येऊन घरात घसून कुटूंबीयांना मारहाण झाली. दोन्ही गटातर्फे दिलेल्या वेगवेगळ्या फिर्यादीनुसार 26 जणांविरुद्ध दंगल व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा रुग्णालयात दोन्ही गटातील सहा जणांवर उपचार सुरु आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nandurebar merathi news two groups dangal