Vidhansabha 2019 : निकालाने युतीच्या आशा बळावल्या

Nashik-Vidhansabha
Nashik-Vidhansabha

नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍न सरकार दरबारी सोडवण्यात आमदार कमी पडले. त्यामुळे खंबीर नेतृत्वाची गरज अधोरेखित होते आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघावर शहरी मतदारसंघाचा अधिक प्रभाव आहे. पूर्व, पश्‍चिम, मध्य तसेच अर्धा देवळाली विधानसभा मतदारसंघ असा शहरी मतदारांचा प्रभाव असलेला साडेतीन विधानसभा मतदारसंघ आहेत, तर सिन्नर आणि इगतपुरी ग्रामीण मतदारसंघ आहेत. शहरी मतदारांना काय हवंय, यावर विधानसभेचे गणित ठरणार आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात यंदा युतीच्या मतांचा टक्का कमालीचा घटला आहे. २०१९ च्या निवडणुकीत ३८ हजार २३७ मतांनी घट झाली. अपक्ष उमेदवार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी ९१ हजारांहून अधिक मते खेचल्याने विधानसभेसाठी त्यांचा खुंटा बळकट झाला आहे. कोकाटे पूर्वाश्रमीचे भाजपचे आहेत. त्यांची कन्या सिमांतिनी जिल्हा परिषद सदस्य आहे.

जिल्ह्यातील एखादा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला दिल्यास त्या बदल्यात भाजपकडून हा मतदारसंघ मागवून तेथून कोकाटे किंवा सिमांतिनी यांना उमेदवारी मिळू शकते. परंतु, विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी शिवसेनेचा प्रबळ दावा राहील. त्यामुळे अन्य पक्षांना कोकाटे हे प्रबळ दावेदार दिसू लागले आहेत. इगतपुरी मतदारसंघात आघाडीच्या मतांचा टक्का वाढल्याने पुन्हा एकदा काँग्रेसच्या निर्मला गावित यांना संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. देवळालीतून शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढल्याने विद्यमान आमदार योगेश घोलप दावेदार असले तरी येथून निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेसह भाजपमध्येही इच्छुकांची संख्या अधिक आहे. 

पूर्व, पश्‍चिम आणि मध्य मतदारसंघात युतीला मताधिक्‍य मिळाल्याने विद्यमान आमदारांचा आत्मविश्‍वास जसा वाढला तसे इच्छुकांची संख्यादेखील वाढली आहे. पूर्वमध्ये आमदार बाळासाहेब सानपांचा येथे अधिक ‘कस’ लागेल. मध्य नाशिक मतदारसंघात मुस्लिम, दलित आणि ओबीसी मतदार अधिक असले तरी युतीला येथूनही बहुमत मिळाल्याने आमदार प्रा. देवयानी फरांदेंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शिवसेनेलासुद्धा ही जागा हवी असल्याने युतीत ते दावा करू शकतात. पश्‍चिम विधानसभेची जागा युती झाल्यास शिवसेनेकडून मागितली जाऊ शकते. त्यामुळे भाजपनेदेखील फिल्डिंग लावली आहे.

पक्षनिहाय इच्छुक
भाजप -
 दिनकर पाटील, वसंत गिते, सुनील बागुल, प्रा. देवयानी फरांदे, हिमगौरी आहेर-आडके, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, उद्धव निमसे, सुरेश पाटील, सुनील आडके, प्रदीप पेशकार, शशिकांत जाधव, गणेश गिते, सरोज आहिरे.

शिवसेना - योगेश घोलप, शिवाजी चुंबळे, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, विनायक पांडे, दिलीप दातीर, संजय चव्हाण, दत्ता गायकवाड.   

राष्ट्रवादी - शेफाली भुजबळ, लक्ष्मण मंडाले, नाना महाले, डॉ. अपूर्व हिरे, ॲड. शिवाजी सहाणे.

काँग्रेस - डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, राजाराम पानगव्हाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com