सारख्या आडनावांच्या गोंधळाने उमेदवारांना चढला ताप

प्रशांत देशमुख
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

घोलपांच्या घरातूनच चार उमेदवार रिंगणात
शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांच्या दोन्ही कन्या 21 व 22 मधून उभ्या असून, त्यांचा पुतण्या रविकिरण व त्यांची पत्नी सुषमा अपक्ष उमेदवारी करत असल्याने एकाच घरातील चार सदस्य यंदा निवडणुकीत उभे राहिल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

नाशिक - माघारीनंतर उडणाऱ्या प्रचाराच्या धुरळ्यात उमेदवार सर्व शक्‍ती (साम, दाम, दंड, भेद) पणाला लावून मतदारांना आपलेसे करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, या परिस्थितीत नाशिक रोडच्या विविध प्रभागांतून एका आडनावाचे एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने निर्माण होणाऱ्या गोंधळामुळे उमेदवारांना ताप चढत चालला आहे. कारण यंदा मतदारांना एकाच वेळी चार-चार उमेदवारांसमोरची बटणे दाबायची असल्याने त्यातून सारख्या आडनावांमुळे होणाऱ्या गोंधळाने अनेकांची नगरसेवकपदाची वाट अडचणीत येणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारींनतर विविध पक्ष व अपक्ष आता नाशिक रोड भागात निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात शेख, घोलप, पगारे, गायकवाड, कोठुळे, साळवे, आवारे, आढाव, बोराडे, खोले या आडनावांचे एकापेक्षा जास्त उमेदवार येथून नशिब आजमावत आहेत. एकाच प्रभागात चार मते द्यावी लागणार आहेत. त्यातच सारख्या आडनावांमुळे डोकेदुखी वाढली आहे. 21 व 22 प्रभागांत शेख आडनावाचे तब्बल आठ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारांना काळजीपूर्वक संपूर्ण नाव वाचूनच मते द्यावी लागणार आहेत. तर काही ठिकाणी या कुटुंबातील मते विभागली जाणार तर नाही, अशी साशंकता व्यक्त होत आहे.

सारखी आडनावे असलेले प्रभाग असे -
प्रभाग 17 : मंगला आढाव, दिनकर आढाव, नरेंद्र आढाव. ज्योती जाधव, कमल जाधव.
प्रभाग 18 : रंजना बोराडे, सुनील बोराडे.
प्रभाग 19 : संतोष साळवे, कन्हय्या साळवे, बाळासाहेब साळवे, शोभा आवारे, पंडित आवारे.
प्रभाग 20 : अशोक पगारे, अंबादास पगारे, विकास गुजर पगारे, संजय पगारे, योगिता गायकवाड, संगीता गायकवाड, सुनील गायकवाड.
प्रभाग 21 : ज्योती खोले, नितीन खोले.
प्रभाग 22 : सुनीता कोठुळे, दीपाली कोठुळे, प्रणाली कोठुळे. गौरी साडे, चंद्रकात साडे. लंकाबाई हगवणे, जयराम हगवणे.

घोलपांच्या घरातूनच चार उमेदवार रिंगणात
शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांच्या दोन्ही कन्या 21 व 22 मधून उभ्या असून, त्यांचा पुतण्या रविकिरण व त्यांची पत्नी सुषमा अपक्ष उमेदवारी करत असल्याने एकाच घरातील चार सदस्य यंदा निवडणुकीत उभे राहिल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: nashik municipal corporation election