जामिनासाठी पैसे मागणारा लाचखोर पोलिस अधिकारी 'ACB'च्या जाळ्यात

दीपक निकम
गुरुवार, 20 जुलै 2017

तडजोडीअंती ९ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

चांदवड : चांदवड पोलिस स्थानकात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्या आरोपीस जामीन मंजूर व्हावा तसेच इतर सहकार्यासाठी नातेवाईकांकडून ९ हजार रुपयांची लाच स्विकारतांना येथील सहा. पोलिस उपनिरीक्षक पोपट निंबा खैरनार या लाचखोर अधिकार्‍यास नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने काल बुधवार (ता. १९) रोजी रंगेहाथ पकडले.

चांदवड पोलिस स्थानकात मंगळवार (ता. १८) दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून अटक झालेल्या आरोपीस जामीन मिळावा तसेच इतर सहकार्य म्हणून दुगाव बीटचे सहायक पोलिस उपनिरीक्षक पोपट खैरनार यांनी अटकेतील आरोपीच्या नातेवाईकांकडून जामीन मिळण्यासाठी तसेच सहकार्य म्हणून दहा हजार रुपयांची मागणी केली होती.

तडजोडीअंती ९ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून काल (बुधवार) चांदवड पोलिस स्थानकात सापळा रचत सीसीटीएनएस रूममध्ये आरोपीच्या नातेवाईकांकडून ९ हजारांची लाच स्विकारतांना सहा. पोलिस उपनिरीक्षक पोपट खैरनार या लाचखोर अधिकार्‍यास रंगेहात पकडण्यात आले. याकामी रात्री उशिरापर्यंत लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांचेकडून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

Web Title: nashik news chandwad police inspector caught with bribe