‘फैजपूर काँग्रेस’चा सुवर्णमहोत्सव अन्‌ भिलारे गुरुजींचे योगदान

‘फैजपूर काँग्रेस’चा सुवर्णमहोत्सव अन्‌ भिलारे गुरुजींचे योगदान

स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या ‘फैजपूर काँग्रेस अधिवेशना’चे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध. ‘फैजपूर काँग्रेस’च्या सुवर्णमहोत्सवाच्या आयोजनात भिलारे गुरुजींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यावेळी बदलत्या राजकीय वातावरणाने सुवर्णमहोत्सव साजरा होतो की नाही, अशी स्थिती असताना भिलारे गुरुजींनी पुढाकार घेत शंकरराव चव्हाणांना या महोत्सवाला येण्यास राजी केले आणि हा सुवर्णमहोत्सव ऐतिहासिक ठरला. भिलारे गुरुजींच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न...
- शिरीष चौधरी, माजी आमदार, रावेर

फैजपूर येथे १९३६ मध्ये काँग्रेसचे देशव्यापी ग्रामीण अधिवेशन झाले आणि फैजपूरला देशभरात ओळख मिळाली. आमचे आजोबा (कै.) धनाजी नाना चौधरी यांच्यासह अनेकांनी या अधिवेशनाच्या आयोजनात मोलाचा वाटा उचलला. भिलारे गुरुजीही आजोबांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण व्यवस्थेत अग्रेसर होते. ‘फैजपूर काँग्रेस’च्या स्मृती आजही सच्च्या काँग्रेसजनांना प्रेरणादायी वाटतात. आमचे कुटुंबीय त्यापैकीच, म्हणून या अधिवेशनाचा सुवर्णमहोत्सवही भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. १९८६ मध्ये सुवर्णमहोत्सवाचे उद्‌घाटन झाले. त्यावेळी बदललेल्या राजकीय वातावरणाने या महोत्सवात काही अडचणी निर्माण झाल्या. महोत्सव साजरा होईल की नाही, वरिष्ठ नेतेमंडळी येईल की नाही, अशी स्थिती होती. भिलारे गुरुजींनी सर्व स्थितीचा आढावा घेत, आयोजनात प्रत्यक्ष पुढाकार घेऊन अनेक कामे मार्गी लावली. त्यांनी स्वत: शंकरराव चव्हाणांना महोत्सवाला येण्यासाठी राजी केले आणि महोत्सव दिमाखात पार पडला. मार्च १९८८ मध्ये या सुवर्णमहोत्सवाचा राजीव गांधींच्या उपस्थितीत समारोप झाला.

भिलारे गुरुजींशी आमचे अत्यंत निकटचे संबंध होते. अनेकदा ते बाबांशी (मधुकरराव चौधरी) बऱ्याच विषयांवर चर्चा करीत. मुंबईला हे दोघेही स्वातंत्र्यसेनानी एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नव्हते. कौटुंबिक संबंध असल्याने गुरुजी कुटुंबातील सर्व सदस्यांचीही विचारपूस करीत असत.

बाबांच्या वाटचालीवर तयार करण्यात आलेल्या ‘लोकसेवक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास तसेच बाबांच्या निधनानंतर मुंबईत झालेल्या श्रद्धांजली सभेला भिलारे गुरुजी आवर्जून हजर होते. कमालीचे विनम्र असले, तरी ते अत्यंत कणखर होते. त्यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावरच काँग्रेसने अनेक वर्षे ‘सुवर्णकाळ’ अनुभवला. आज भिलारे गुरुजींच्या निधनाची वार्ता कळली. ‘फैजपूर काँग्रेस’चा साक्षीदार असलेला शेवटचा स्वातंत्र्यसैनिकही आज आपल्यातून गेला, ही गोष्ट चटका लावून जाणारी आहे. गुरुजींच्या स्मृती आमच्यासारख्या काँग्रेसजनांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील, असा विश्‍वास वाटतो. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com