गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

हॉटेल मालक पाणमंद यांनी ओळ्खपत्राची मागणी केली. मात्र पाटील याने ओळखपत्र नसल्याचे सांगत आपण पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याचे सांगितले.

नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पीए सांगून ठक्कर बाजार येथील हॉटेलचालकाला शिवीगाळ व पोलिसांना बोलावून खोटे सांगणाऱ्या बनावट पीएला पोलिसांनी रात्री उशिरा पखालरोड परिसरातून अटक केली. संदीप नरोत्तम पाटील (35, पखालरोड, नाशिक) असे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या या पीएचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सचिन गंगाराम पानमंद (रा. उंटवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता. 2) दुपारी संदीप पाटील हा एका वयस्क इसमाला घेऊन ठक्कर बाजार बस स्थानक येथील सह्याद्री हॉटेलमध्ये आला. त्यावेळी हॉटेल मालक पाणमंद यांनी ओळ्खपत्राची मागणी केली. मात्र पाटील याने ओळखपत्र नसल्याचे सांगत आपण पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याचे सांगितले. तरीही पाणमंद यांनी ओळखपत्राचीच मागणी केली असता त्याने हॉटेलच्या रजिस्टरवर स्वतः नाव लिहिले आणि 308 नंबरच्या रूममध्ये सामान ठेवून माझा माणूस ओळखपत्र घेऊन येईल, असे सांगून निघून गेला. सायंकाळी साडेसहाच्या वेळी मद्याच्या नशेत आला आणि वाद घालू लागला. आम्हाला ओळखपत्र विचारण्याचा जाब विचारत त्याने रुमचे दिलेल्या पैशांची मागणी केली. पैसे देत नाही म्हटल्यावर त्याने शिवीगाळ करीत स्वतःच पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस आले. त्यांना त्याने पालकमंत्र्यांचे पीए असल्याचेच सांगितले. पोलिसांनी समजावून त्याला सोडून दिले.

मात्र, पाणमंद यांनी पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात फोन करून त्यांच्या पीए संदर्भात विचारणा केली असता तो त्यांचा पीए असल्याचे समजले आणि त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पालकमंत्र्यांचा खोटा पीए संदीप पाटील यास रात्री उशिरा अटक केली आहे. संशयित पाटील याने पालकमंत्रयांच्या नावाने किती जणांची फसवणूक केली हे चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news girish mahajan's fake PA detained