पेपर सोडविणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर कोसळली वीज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नाशिक - चिंचवड (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील शाळेत प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत नववीचे दोन, तर दहावीचा एक असे तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. यात एक विद्यार्थिनी, तर दोन विद्यार्थी असून, त्यांच्यावर हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याबाबत संबंधित शाळेकडून प्रकरणाची वाच्यता होऊ नये, यासाठी ते दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रवीण सुभाष घाटाळ (वय १६, रा. जातेगाव, ता. त्र्यंबकेश्‍वर), विमल सदू खानझोडे (१५, रा. वरसईल, पो. खरवळ, ता. त्र्यंबकेश्‍वर), महेश नामदेव चौधरी (१५, रा. निरगुडे, पो. हरसूल, ता. त्र्यंबकेश्‍वर) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय असून, या विद्यालयात आज प्रथम सत्राची परीक्षा सुरू होती. दुपारी एका वर्गात दहावी व नववीचे विद्यार्थी पेपर सोडवीत असताना, अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याच वेळी भयंकर असा विजेचा कडकडाट झाला आणि ती शाळेवर कोसळली.
या वेळी वर्गात पेपर सोडविण्यात मग्न असलेला दहावीचा विद्यार्थी प्रवीण घाटाळ, नववीची विद्यार्थिनी विमल खानझोडे, महेश चौधरी यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि त्यात ते भाजले गेले. त्यांना तत्काळ हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. शासकीय १०८ रुग्णवाहिकेतून तिघांना हरसूल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, संबंधित शाळेकडून या प्रकरणाची वाच्यता होऊ नये, यासाठी दडपण आणले जात असल्याची चर्चा शिक्षकांत होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news lightning on three student