सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मृत्युचे नेमके कारण समजू शकले नाही.

डुबेरे : सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील एका शाळकरी मुलीने आज सायंकाळी राहत्या घरात आत्महत्या केली.  

मूळची समशेरपूर (ता. अकोले) येथील ती मुलगी आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईसोबत डुबेरे येथे मामाच्या घरी राहत होती. डुबेरे येथील ढोलमळा रस्त्यावर शिवाजी महादू शिंदे यांची वस्ती आहे. आजोळी आपल्या आई व बहिणीसोबत राहणाऱ्या तिला व्रुद्ध आजी-आजोबा आहेत. दोन बहिणींचा विवाह झाला असून मामा कामानिमित्त नाशिक येथे राहतात.

आज तिची आई व बहीण शेतात कामाला गेलेल्या होत्या. व्रृद्ध आजी आजोबा घरी होते. सायंकाळी घरी पाहुणे आलेले होते. त्या नातेवाइकांना सोडण्यासाठी आजी आजोबा बाहेर गेले होते. पाहुणे गेल्यानंतर दरम्यानच्या काळात घरातून प्रतिसाद न आल्याने आजी आजोबांनी आरडाओरड केली. दरम्यान सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या मुलीने घरात छताला साडीला गळफास बांधून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. डुबेरेचे माजी सरपंच शरद माळी यांनी पोलिसांना घटनेची खबर दिली.

मुलीच्या मामांनी घटनास्थळी मोबाईल व सीमकार्ड फुटलेल्या स्थितीत आढळल्याचे सांगितले. सिन्नर पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सिन्नरच्या नगरपालिका रूग्णालयात दाखल केले आहे. मृत्युचे नेमके कारण समजू शकले नाही. सकाळी शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे नेमके कारण मिळू शकणार आहे. पोलिस हवालदार मंडलिक पुढील तपास करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news sinnar school girl commits suicide