सेफ्टी पीन बेतली जिवावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नाशिक - लहान मुले काय अन्‌ कशाशी खेळतील याचा भरवसा नसतो. नऊ वर्षांच्या मुलीने सेफ्टी पीन तोंडात टाकली. ती घशात अडकली अन्‌ तिची बोलण्याची अन्‌ गिळण्याची प्रक्रियाच बंद झाली. खासगी रुग्णालयात उपचार करणे अशक्‍य असल्याने पालकांनी मंगळवारी (ता. 3) रात्री तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी शस्त्रक्रिया करून मुलीच्या घशातील सेफ्टी पीन काढण्यात आली.

नाशिक - लहान मुले काय अन्‌ कशाशी खेळतील याचा भरवसा नसतो. नऊ वर्षांच्या मुलीने सेफ्टी पीन तोंडात टाकली. ती घशात अडकली अन्‌ तिची बोलण्याची अन्‌ गिळण्याची प्रक्रियाच बंद झाली. खासगी रुग्णालयात उपचार करणे अशक्‍य असल्याने पालकांनी मंगळवारी (ता. 3) रात्री तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी शस्त्रक्रिया करून मुलीच्या घशातील सेफ्टी पीन काढण्यात आली.

सीतापुरी (ता. कळवण) गावात राहणारी प्रमिला गवळी ही काल सायंकाळी घरात खेळत होती. त्या वेळी तिने सेफ्टी पीन तोंडात टाकली. तोंडामध्ये चघळता- चघळता ती सेफ्टी पीन उघडली गेली आणि त्याचवेळी तिच्याकडून ती गिळली गेली. ती घशात अडकली. काही क्षणांमध्ये तिला बोलताही येईना आणि गिळताही येईना, त्यामुळे तिच्या पालकांनी गावातीलच डॉक्‍टरकडे नेले असता, त्यांनी वणीला जाण्याचा सल्ला दिला. वणीत प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून पाहिले; परंतु तिच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता होती. अन्ननलिका, स्वरनलिका व श्‍वासनलिकेला इजा पोचण्याची शक्‍यता होती. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे जाण्याचा सल्ला दिला.

गवळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नसल्याने त्यांनी प्रमिलाला घेऊन नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. रात्री दीड वाजता अतिदक्षता विभागात तिला दाखल करून घेण्यात आले. आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. संजय गांगुर्डे यांनी प्रमिलाची तपासणी केली. एक्‍स-रे मध्ये सेफ्टी पीन स्वर व श्‍वसननलिकेजवळ अडकली असल्याचे दिसून आले. डॉ. गांगुर्डे यांनी दुर्बिणीच्या साहाय्याने अत्यंत कठीण व नाजूक अशी शस्त्रक्रिया पार पाडली. पाऊण तासानंतर सेफ्टी पीन प्रमिलाच्या तोंडातून काढण्यात आली आणि तिच्या जिवावर बेतलेले संकट दूर झाले.

अतिशय कठीण अशी शस्त्रक्रिया होती. धोकाही होता. स्वरनलिकेला इजा झाली असती, तर आवाज जाऊ शकला असता वा श्‍वासनलिकेला इजा पोचली असती, तर तिच्या जिवावरही बेतू शकले असते, त्यामुळे खूप नाजूक अशी शस्त्रक्रिया होती. पालकांनी मुलांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे, अन्यथा अशा प्रकारे जिवावर बेतू शकते.
- डॉ. संजय गांगुर्डे, शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news surgery on small girl