नाशिक पूर्व अन्‌ पश्‍चिमचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नऊ पुलांवर वाहतूक ठप्प
चोपडा पूल, अहिल्यादेवी (व्हिक्‍टोरिया) पूल, कन्नमवार, तपोवन, टाकळी संगम, पंचवटीतील काट्या मारुती पोलिस चौकीजवळील पूल, विहितगाव, काठे गल्ली भागातील सोनजे मार्गावरील पूल सुरू असले तरी पूर पाहणाऱ्यांच्या गर्दीमुळे येथील वाहतूक ठप्प होती.

नाशिक-औरंगाबाद महामार्ग ठप्प
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील ओढा येथे दुपारी दोननंतर पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील औरंगाबादकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.

नाशिक - पावसाचा जोर शनिवारी (ता. ३) मध्यरात्रीपासून वाढल्याने गंगापूर व दारणा धरणांतून विसर्ग वाढल्याने शहरातील तब्बल बारा छोटे, मोठे पूल पाण्याखाली गेले. यामुळे नाशिक रोड, सातपूर, सिडको व पंचवटीतील काही भागाचा शहराच्या बाजारपेठेशी संपर्क तुटला. 

गंगापूर धरणाच्या बाजूला गिरणारे भागाला जोडणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी गेल्याने सकाळपासून येथील वाहतूक बंद करण्यात आली. पुढे चांदशी गावाकडे जाणाऱ्या पुलाला पाणी लागले, तर दुपारी एकनंतर पुलावरून पाणी गेल्याने चांदशी गावाकडील वाहतूक बंद करण्यात आली. सकाळी सोडलेले पाणी नाशिक शहराच्या नदीपात्रात पोचेपर्यंत बारा वाजले होते. पाण्याने धोकादायक पातळी ओलांडल्यानंतर घारपुरे घाट पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अनेक वाहनधारकांना चोपडा पुलामार्गे पंचवटीत मार्गाक्रमण करावे लागले. रामसेतूवरून शनिवारी पाणी गेल्याने तीन दिवसांपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गाडगे महाराज पुलावरून दुपारी एकला पाणी गेले. पुढे टाळकुटेश्‍वर मंदिर येथील पुलाला पाण्याने वेढा घातल्याने जुन्या नाशिक भागातून पंचवटी व पंचवटीमार्गे नाशिककडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली. टाकळी गावातील पुलाबरोबरच नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने संगम पुलावरून महामार्गावर वाहतूक वळविण्यात आली. सातपूर व सिडको भागाला जोडणारा आयटीआय पूल बंद करण्यात आला.

चुंचाळे शिवारातील चुंचाळे ते सातपूरला जोडणाऱ्या नासर्डी नदीवरील पूलही काही काळ पाण्याखाली गेल्याने अंबड व सातपूर भागांतील औद्योगिक वसाहतींचा संपर्क तुटला. पिंपळगाव खांब पुलावरून पाणी गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक बंद करण्यात आली. पिंपळगाव बहुला पुलावरून पाणी गेल्याने त्र्यंबकेश्‍वरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. जय भवानी रोडमार्गे खोले मळ्याकडून वडनेर दुमाला भागाकडे जाणाऱ्या वालदेवी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. नांदूर नाक्‍याकडे जाणाऱ्या संत जनार्दन स्वामी पुलावरून प्रथमच पाणी गेल्याने औरंगाबाद महामार्गाकडे जाणारी वाहतूक बंद झाली. नागजी हॉस्पिटलकडून इंदिरानगरकडे जाणारा नासर्डी नदीवरील पूलही दुपारी बंद करण्यात आला.

पाण्याखाली गेलेले रहिवासी भाग...

 • अशोका मार्ग
 • पेठ रोडवरील संजयनगर
 • गणेशवाडी येथील झोपडपट्टी
 • टाकळी गावातील राहुलनगर
 • टाकळी रोडवरील समतानगर
 • अंबड औद्योगिक वसाहतीतील नासर्डी नदीलगतचा भाग
 • चुंचाळे घरकुल योजनेचा परिसर
 • आयटीआय पुलाजवळील झोपडपट्टी
 • संत कबीरनगर
 • निर्मला कॉन्व्हेंट शाळेसमोरील राम-जानकी अपार्टमेंट
 • काट्या मारुती पोलिस चौकीजवळील परिसर
 • मल्हारखाण झोपडपट्टी
 • गंगापूर रोडवरील जोशीवाडा झोपडपट्टी
 • सातपूर भागातील शिवाजीनगरचा काही भाग
 • सराफ बाजार, तिवंधा लेन, गोरेराम लेन
 • सोमवार पेठेतील नेहरू चौक
 • आधाराश्रम, घारपुरे घाट
 • म्हसोबा लेनमागील गंगावाडी
 • घारपुरे घाट येथील गोदावरीनगर
 • पेठ रोडवरील कॅनॉल रोड
 • नाशिक-पुणे महामार्गावरील बोधलेनगर, आरटीओ कॉलनी
 • पंचवटीतील अश्‍वमेधनगर
 • पेठ रोडवरील शरद पवार बाजार समिती
 • तिडके कॉलनी
 • नवशा गणपती परिसर
 • पंचवटीतील शनी चौकातील काही भाग
 • सरदार चौकातील काही भाग

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Rain Flood Water Village Contact Break