esakal | बापरे! नाशिक जिल्ह्यात तीस दिवसांत एक लाख १४ हजार पॉझिटिव्‍ह
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बापरे! नाशिक जिल्ह्यात तीस दिवसांत एक लाख १४ हजार पॉझिटिव्‍ह

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : महिनाभरात जिल्ह्यात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येने नवनवीन उच्चांक गाठले. १९ मार्चपासून शनिवार (ता.१७) अशा तीस दिवसांच्‍या कालावधीत जिल्ह्यात एक लाख १४ हजार ६२६ पॉझिटिव्‍ह आढळले आहेत. तुलनेत कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ८९ हजार इतकी होती. कोरोनाबाधितांच्‍या वाढीच्‍या या गतीने देशभरातील अन्‍य विविध शहर, जिल्ह्यांना मागे टाकले असल्‍याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्‍या प्रादुर्भावाची स्‍थिती नियंत्रणात होती. मात्र त्‍यानंतर नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचा आलेख वाढत गेला. दर दिवशी आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येचा उच्चांक तीस दिवसांत अनेक वेळा मोडला गेला. नुकतीच चार दिवसांपूर्वी १४ एप्रिलला जिल्ह्यात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची उच्चांकी संख्या सहा हजार ८२९ इतकी राहिली.

हेही वाचा: धक्कादायक! नाशिकमध्ये अंतिम विधीसाठी सुध्दा पैशाची मागणी; VIDEO व्हायरल

जास्‍त लोकसंख्या असलेल्‍या मुंबई, पुणे, नागपूरसारख्या राज्‍यातील शहरांसह देशभरातील अन्‍य मोठ्या शहरांच्‍या तुलनेत नाशिकला आढळणाऱ्या या कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्‍याने संपूर्ण देशाचे लक्ष आता नाशिककडे लागले आहे. एरवी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळविणारे नाशिक यंदा मात्र कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय स्‍तरावर चर्चेचा विषय ठरल्‍याने नाशिककरांच्‍या चिंतेत भर पडली आहे.

तीस दिवसांत आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्राप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्‍णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. नाशिक महापालिका हद्दीत ६३ हजार ५८८, नाशिक ग्रामीणमध्ये ४५ हजार ८३०, मालेगाव महापालिका क्षेत्रात तीन हजार ४२५, जिल्‍हाबाहेरील एक हजार ७८३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू ग्रामीण भागात

तीस दिवसांत नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येसोबतच मृत्‍यूसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत झालेल्‍या ६९३ मृत्‍यूंपैकी नाशिक ग्रामीण भागातील ३५९ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक शहरातील २६३, मालेगावच्‍या ४३ तर जिल्‍हाबाहेरील २८ बाधितांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

हेही वाचा: साहेब.. मेडिकलमध्ये चाललो, भाजीपाला-किराणा घ्यायचाय, अन्‌ बरेच काही!

तीस दिवसांतील ठळक आकडेवारी

कोरोनाच्‍या स्‍वॅब चाचण्या------तीन लाख ६८ हजार २०४

आढळलेले पॉझिटिव्‍ह----------एक लाख १४ हजार ६२६

कोरानामुळे झालेले मृत्‍यू------६९३

कोरोनामुक्‍त झालेले रुग्‍ण-----८९ हजार ९७७