नाशिक : आदिवासी आश्रमशाळेत कोरोनाचा विस्फोट; १५ विद्यार्थ्यांना लागण | Corona | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Testing

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेत कोरोनाचा विस्फोट; १५ विद्यार्थ्यांना लागण

नाशिक : मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने आश्रमशाळा सुरू ठेवण्यासह इतर नियोजनाबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आदिवासी विकास विभागाच्या मुंढेगाव येथील आश्रमशाळेत आठवी ते बारावीच्या वर्गात तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेतील एका विद्यार्थी चार दिवसांपूर्वी थंडी-तापाने आजारी होता. त्याची ॲन्टिजेन व आरटीपीसीर चाचणी करण्यात आली. या विद्यार्थ्याची ॲन्टिजेन चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली. त्यामुळे आदिवासी विभागात खळबळ उडाली. त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पण त्याचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. मात्र विद्यार्थ्यांचा ॲन्टिजेन चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर हा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला होता. तसेच या ठिकाणी मध्यवर्ती स्वयंपाकगृह आहे. तिथे कर्मचारी काम करतात. खबरदारीचा उपाय म्हणून विभागाकडून शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील कर्मचारी अशी एकूण ३७४ जणांची आरटीपीसाआर चाचणी करण्यात आली. या चाचणीत १४ विद्यार्थ्यांचा चाचणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला.

हेही वाचा: नाशिक : भद्रकाली परिसरात दीडशे वर्षांपूर्वीचा कुंटणखाना सील

विद्यार्थ्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आल्याने आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली. जिल्हा प्रशासनातर्फे त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली. जिल्हास्तरावर याच संबंधाने बैठक झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांना काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शिवाय नाशिकच्या प्रकल्पाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना झालेल्या कोरोना लागणसंबंधी आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिक : ठरलं तर..! 13 डिंसेंबरपासून उघडणार शाळा; पालिकेची घोषणा

शिक्षणाच्या भवितव्यापुढे प्रश्‍नचिन्ह

आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना झालेल्या कोरोनाच्या लागणमुळे शिक्षणाच्या भवितव्यापुढे प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना ठेवायचे की नाही इथपासून ते कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी करत शिक्षण सुरळीत कसे सुरू ठेवायचे याची केवळ नियमावली तयार करत नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीचे शिवधनुष्य यंत्रणांना पेलावे लागणार आहे.

Web Title: 15 Students Tested Corona Positive From Mundhegaon Tribal Ashram School In Igatpuri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusNashik
go to top