Nashik News : रामतीर्थावर 18व्या शतकातील शिलालेख; पुण्याचे विरगळ अभ्यासक अनिल दुधाणेंचे संशोधन

Inscription & Anil Dudhane
Inscription & Anil Dudhaneesakal

नाशिक : येथील गोदावरी तीरावरील रामतीर्थ परिसरातील अजगरबाबा समाधी स्थळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ललाट बिंबावर देवनागरी भाषेतील शिलालेख आहे. शिलालेख उठाव स्वरूपाचा असून, तो आठ ओळींचा आहे.

पुण्याचे विरगळ अभ्यासक अनिल दुधाणे यांनी नाशिकमध्ये येऊन शिलालेखाचे संशोधन व अभ्यास केला आहे. (18th Century Inscription on Ram Teertha Research by Anil Dudhan distinguished scholar from Pune Nashik News)

शिलालेखाचे प्रयोजन समाधी मंदिर बांधल्याची आणि बांधकामाची स्मृती जपणे, गोदावरीतीरी काही बांधकामे केल्याची स्मृती जपणे असे असून, हा शिलालेख अठराव्या शतकातील शके १७२०, हेमलंबी नाम संवत्सरे काळ वर्ष अठरावे शतक, सन १७९८ मधील आहे. त्या वेळी छत्रपती धाकटे शाहू महाराज सातारा यांची कारकीर्द होती.

मंदिराविषयी ‘सकाळ’शी बोलताना श्री. दुधाणे म्हणाले, की अजगरबाबा संजीवन समाधी मठाचा मोठा इतिहास आहे. मथुरेजवळील हे एक सिद्धपुरुष होते. त्यांना अजगरबबा असे म्हणत असत. शिवाजी विठ्ठल व त्यांची पत्नी माईसाहेब यांनी त्यांची सेवा केली. पुढे शिवाजी विठ्ठल यांचे ज्येष्ठ पुत्र अमृतराव हे दक्षिणेत येऊ लागले.

त्या वेळेस त्यांनी त्या सिद्धपुरुषास चांदीच्या अंबारीत बसवून नाशिकच्या पंचवटीत आणले. इथे त्यांची उत्तम प्रकारे काही दिवस स्वतः सेवा केली. अजगरबाबा यांनी १७८८ मध्ये संजीवन समाधी घेतली. आजही रामतीर्थावर अजगरेश्वराची छत्री म्हणून ती ओळखली जाते.

Inscription & Anil Dudhane
Nashik News : दिंडोरी, पेठ रोडवरील ब्लॅक स्पॉट जैसे थे

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अमृतराव विंचूरकर यांचा एक शिलालेख आहे. त्यांनी लक्ष्मण कुंडाजवळ दुतोंड्या मारुती स्थापन केला. मूर्तीच्या बाजूला सर्पाची नक्षी कोरण्यात आली आहे. शालिवाहन शकाच्या १७२० मध्ये विंचूरकर घराण्याचे कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहचरणी तत्पर असलेले उमदेतून मुलुक बाहदर अमृतराव शिवदेव विंचूरकर यांनी नाशिकमधील गोदावरी नदी घाटावरील अजगरबाबा समाधी व परिसरात तटबंदीयुक्त काही बांधकामे केली अथवा जीर्णोद्धार केला.

शिलालेखातील अमृतराव यांनी एका महापुरुषाची समाधी बांधली आहे. त्यावरून अमृतराव विंचूरकर हे आपल्या आजोबा, वडिलांप्रमाणे सेवा, आध्यात्मिक-धार्मिक, सामाजिक व दानी वृत्तीचे होते. हे या शिलालेखाचे महत्त्व आहे, असेही श्री. दुधाणे यांनी सांगितले. संशोधन कामात त्यांना अजिंक्य हजारे, प्रशांत परदेशी यांचे सहकार्य मिळाले. शिलालेखातून नाशिकच्या इतिहासाची ओळख पुढे आली आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Inscription & Anil Dudhane
Nashik News : भगवंताचे अखंड नामस्मरण हाच श्‍वास अन् जीवन

शिलालेखावरील मजकूर

।। श्री ।।

श्री लक्ष्मी नृसिंह चरणी

तत्पर अमृतराव

शिवदेव उमदेतु

न मुलुख बाहदर

विंचूरकर

सके १७२०

Inscription & Anil Dudhane
National Startup Day : वेड स्टार्टअप्सचे...

इतिहासामधील विंचूरकरांचा उल्लेख

- विंचूरकर घराण्याचे मूळ पुरुष सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचा जन्म १६९५ मध्ये सासवडमध्ये. त्यांचे मूळचे आडनाव दाणी.

- छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे ते १७१५ पासून रुजू. पुढे सरदार पदापर्यंत पोचले.

- सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे मराठा साम्राज्याच्या चार खांबांपैकी एक. तसा उल्लेख श्रीमंत माधवराव पेशवे यांनी केलाय.

- बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू आणि चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली दयाबहाद्दूर यांच्या विरुद्धच्या युद्धात सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी शौर्य गाजवले.

- १७३१ मध्ये सयाजी गुजर यांची घनघोर युद्धात सरदार विंचूरकर यांनी दाणादाण उडवली.

- उत्तर हिंदुस्थानमध्ये १७३४ ते १७३८ मध्ये सर्व युद्धात विजय मिळविण्यात सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचा मोठा वाटा.

- पेशव्यांनी विंचूरकरांना ‘अकरा महालांचा फौज सरंजाम’ बहाल केला.

- १७५३ मध्ये श्रीरंगपट्टनम, सूरत, अहमदाबाद आणि कुंभेरी येथील युद्धांमध्ये सरदार विंचूरकर यांनी मराठी साम्राज्यासाठी विजयश्री खेचून आणली.

- ग्वाल्हेर येथे १७५४ मध्ये सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी एकहाती विजय मिळविला.

- १७६१ मध्ये पानिपत, राक्षसभुव, हैदरच्या विरुद्ध रत्तेहळ्ळी, हैदरअली विरुद्ध आनेवाडी येथे सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी लढाया केल्या.

- गोहादेत येथे १७६५ मध्ये सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर आयुष्यातील शेवटची लढाई लढले.

- सरदार विंचूरकर यांचे वाडे विंचूर, नाशिक, पुणे, ग्वाल्हेर येथे इतिहासाची साक्ष देतात.

"राज्यभरातील अनेक विरगळ आणि शिलालेखांचा अभ्यास केला. त्यामधून इतिहासाच्या जवळ पोचणे शक्य होते. नाशिकच्या रामतीर्थावर अजगरेश्वराची छत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजगरबाबा समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख विंचूरकर घराण्याच्या इतिहासाला उजाळा देतो. अमृतराव शिवाजी विंचूरकर यांनी गोदाकाठी देवालय बांधून एक शिवलिंग स्थापन केले. ते अजगरबाबा नावाने ओळखले जात आहे. नाशिकमध्ये अनेक विरगळ आणि शिलालेख आहेत. भविष्यात त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत."

- अनिल दुधाणे, विरगळ अभ्यासक, पुणे

Inscription & Anil Dudhane
Nashik Teachers Constituency Elections : ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल; चर्चांना उधाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com