Latest Crime News | 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये सोन्याच्या पोत लंपासb | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chain snatching News

Chain Snatching Crime : 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये सोन्याच्या पोत लंपास

नाशिक : आडगाव येथे किराणा दुकानात पेन खरेदीसाठी आलेल्या संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून दुचाकीवरून पोबारा केल्याची घटना घडली, तर दुसऱ्या घटनेत दूर्गा पूजा आटोपून कारकडे जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पावणे दोन लाखांचा राणीहार दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्याने खेचून नेल्याची घटना गांधीनगरला भरदिवसा घडली आहे. लुटमारी व सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या या घटनांनी पोलिसांच्या महिला सुरक्षिततेच्या उपक्रमांचे वाभाडेच निघाले आहेत. (2 gold chain snatching cases in different instances Nashik Latest Crime News)

मिनाक्षी दिनकर ठानगे (रा. पल्लवी रोहाऊस, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता.३) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्या किराणा दुकानात काम करीत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या शाईन दुचाकीवरून दोघे दुकानासमोर आले. त्यातील पाठीमागे बसलेला संशयित दुकानाच्य काऊंटरवर आला आणि त्याने पेन खरेदीसाठी मागितला. त्या पेन घेण्यासाठी मान वळविली असता, संशयिताने त्यांच्य गळ्यातील सोन्याची पोत जोरात ओढली.

या झटापटीत पोत तुटली आणि अर्धी पोत संशयिताच्या हाती लागताच त्याने बाहेर थांबलेल्या दुचाकीस्वाराच्या दुचाकीवर बसून पसार झाला. यात मिनाक्षी ठानगे यांच्या डाव्या डोळ्यजवळ आणि गालावर दुखापत झाली. याप्रकरणी आडगाव पोलिसात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक घोरपडे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Adimaya- Adishakti : पंच तुरेवाले देवी मंदिर

रिता अशोक लोध (रा. रुपाली बंगला, सह्याद्री कॉलनी, कॅनॉल रोड, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.३) गांधीनगर येथक्षल अटल बिहारी गार्डनजवळ दूर्गा पूजा मंडळातील दूर्गा पूजा आटोपून पार्क केलेल्या कारकडे पायी जात होत्या. त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने रिता लोध यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपयांचा सोन्याचा राणीहार बळजबरीने खेचून पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला सुरक्षिततेचे वाभाडे

शहर पोलिसांकडून महिला सुरक्षिततेसंदर्भात सातत्याने उपक्रम राबविल्याचे सांगितले जाते. निर्भया पथकांची गस्ती पोलीस ठाण्यानिहाय करण्यात येतात. परंतु, असे असतानाही उपनगरीय परिसरामध्ये सोनसाखळी चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य करीत दागिने हिसकावून नेले जात आहे. नाकाबंदीचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या हातावर सोनसाखळी चोरटे तुरी ठेवून पोबारा करीत आहेत. त्यामुळे शहरातील पोलिसांच्या सुरक्षिततेचेच वाभाडे निघाले आहेत.

हेही वाचा: Theft on Wani Gad : सप्तशृंगगडावर भाविकांचे 5 लाखांचे दागिने लंपास