esakal | आम्ही आरोग्यरक्षक! नाशिकच्या 3 महिलांनी सांभाळली आरोग्यामंत्रीपदाची जबाबदारी
sakal

बोलून बातमी शोधा

nashik women health minister

आम्ही आरोग्यरक्षक! नाशिकच्या 3 महिलांनी सांभाळली आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (जि.नाशिक) : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेल्या डॉ. भारती पवार (dr. bharati pawar) यांचा समावेश झाला आहे. यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात पुष्पाताई हिरे यांनी, तर त्यानंतर डॉ. शोभा बच्छाव यांनी काही काळ राज्याचे आरोग्य राज्यमंत्रिपद सांभाळले आहे. म्हणजेच आतापर्यंत नाशिकच्या तब्बल तीन महिलांना राज्यासह देशाच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली आहे. (3-women-from-Nashik-took-charge-of-post-of-Health-Minister-nashik-marathi-news)

राज्यासह देशाच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळण्याची संधी

(स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी १९६२ मध्ये बिनविरोध निवडून येत संरक्षणमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात नाशिकचे प्रतिनिधित्व केलेले आहे. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या डॉ. भारती पवार यांच्या रूपाने प्रथमच स्थानिक महिलेला केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील तत्कालीन दाभाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पुष्पाताई हिरे यांच्या रूपाने एका महिलेला प्रथमच मंत्रिपदाच्या रूपाने राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली होती. १९८८ ते ९० या दोन वर्षांच्या काळात त्यांनी परिवहन व ऊर्जा राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यावर पुन्हा १९९० ते ९५ या काळात पुष्पाताईंनी सार्वजनिक आरोग्यमंत्रिपद सांभाळत आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता.

डॉ. बच्छाव ठरल्या दुसऱ्या मंत्री

शरद पवार यांच्यानंतर विलासराव देशमुख यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा आली. २००८ मध्ये त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांची वर्णी लागली. तेव्हा त्यांनी नाशिकच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रिपदाबरोबरच अन्न व नागरी पुरवठामंत्रिपदाची धुरा सोपविली. शोभाताईंनी आपल्या अल्प कार्यकाळात कामाचा ठसा उमटविला होता.

डॉ. पवार चौथ्या आरोग्यमंत्री

नाशिक विधानसभा मतदारसंघाला आजवर आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी तब्बल तीन वेळेस मिळाली. १९९५ ते ९९ या काळात राज्यात युतीची म्हणजे शिवसेना, भाजप युतीची सत्ता होती. या काळात डॉ. दौलतराव आहेर यांना साडेचार वर्षे मंत्रिपदाची संधी मिळाली. तत्पूर्वी १९९० ते ९५ या काळात पुष्पाताई राज्याच्या आरोग्यमंत्री राहिल्या. त्यानंतर २००८ ते ०९ या काळात डॉ. शोभा बच्छाव यांनी आरोग्य राज्यमंत्रिपद सांभाळले. म्हणजेच नाशिकला राज्यासह केंद्रीय पातळीवर आरोग्यमंत्रिपद सांभाळण्याची संधी चौथ्यांदा मिळाली आहे. विशेष म्हणजे चारपैकी तीन वेळा महिलांनाच संधी मिळाल्याने आरोग्य क्षेत्रात काम करण्याची तिसरी संधी नाशिकला मिळाली आहे.

हेही वाचा: पंधरा शस्त्रक्रिया होऊनही जिद्दी शिक्षिकेने दिले कॅन्सरलाच आव्हान..!

हेही वाचा: भुजबळांच्या चिमट्यांनी भाजप नेत्यांना ठसके!

loading image