
Saptashrung Gad : सप्तशृंगगडावर नववर्षानिमित्त 300 किलो द्राक्षांची आरास
वणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी पहाटे प्रातसमयीच्या आरतीपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
सप्तशृंगीदेवीच्या मंदिरात गुढी उभारून गुढीपाडवा साजरा झाला. आजची पंचामृत महापूजा नाशिक येथील देवीभक्त सुधीर सोनवणे यांनी केली. सप्तशृंगी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांची व द्राक्षांची सजावट करण्यात आली असून, देणगीदार ॲड. अनमोल पाटील (नाशिक) यांच्यामार्फत ३०० किलो द्राक्षांची, तर मुंबई येथील देवीभक्त विमल पवार यांनी फुलांची सजावट केली.
हेही वाचा: एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
या वेळी संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण बघायला मिळाले. विशेष म्हणजे बुधवारी (ता. २२) देवीला भरजरीचे गुलाबी रंगाचे महावस्त्र नेसविण्यात आले आहे. तसेच गुढीपाडव्यानिमित्त ट्रस्टच्या मुख्य कार्यालयापासून ते मंदिरापर्यंत देवीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
देवीला चांदीचा मुकुट, सोन्याचे पुतळी गाठले, सोन्याचा कुयरी हार, मंगळसूत्र, सोन्याची वज्रटीक, सोन्याची नथ, सोन्याचे कर्णफुले, चांदीचा कमरपट्टा, चांदीच्या पादुका आदी आभूषणे परिधान करण्यात आली होती. बुधवारी दिवसभरात तीस हजारांवर भाविक आदिमायेचरणी नतमस्तक झाले.