esakal | नाशिक जिल्ह्यात ३३५ शाळांची उद्यापासून वाजणार घंटा; निर्बंधही कडक
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

जिल्ह्यात ३३५ शाळांची उद्यापासून वाजणार घंटा; निर्बंधही कडक

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कोरोना प्रतिबंधामुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार, सोमवार (ता. १९)पासून जिल्ह्यातील ३३५ शाळा सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरोनाची सद्यःस्थिती पाहता निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत. तर, पावसाने मोठी ओढ दिल्याने दर गुरुवारी नाशिक शहरात पाणीकपात केली जाणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. (335 schools will be started in Nashik district from tomorrow)

भुजबळ म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्यात शैक्षणिक कामकाज पूर्णपणे थंडावले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३३५ शाळा येत्या सोमवारपासून नियम पाळून सुरू होतील. हा निर्णय फक्त ग्रामीण भागातील शाळांबाबत असून, शहरातील शाळांबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या शाळांबाबत प्रस्ताव शासनाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील शाळांबाबत निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

या वेळी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्‍हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: 'घाबरु नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यास आश्वासन

...तर दिवसाआड पाणीपुरठा

पावसाने जिल्ह्यात मोठी ओढ दिली आहे. गेल्या वर्षी ३७ टक्के पाऊस झालेल्या जिल्ह्यात यंदा २३ टक्केच पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीत आठवड्यातील एक दिवस, दर गुरुवारी पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पावसाची स्‍थिती अशीच राहिली आणि महिनाभर पाऊसच आला नाही, तर ऑगस्टपासून दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकानांही शहर-जिल्‍ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, की एक ते दीड महिन्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २.२ टक्के झाला असून, मृत्युदर राज्याच्या तुलनेत कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साधारण तीन लाख ७९ हजार लोकांना लसीकरणाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा: संतोषा, सारूळ अन्‌ भांगडी डोंगरांची नियम डावलून विल्हेवाट

संसर्गदर २.२ टक्के

राज्यात तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना प्रतिबंधक निर्बंध कडकपणे राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक करण्यात येणार आहेत. याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गदरात अल्पशी वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्गदर २.२ टक्के झाला आहे. सव्वा टक्क्याच्या आसपास असलेला हा दर दोन टक्केच्या पुढे गेला आहे. त्यामुळे शहरात निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. राजकीय पक्षांनी त्यांच्या कार्यक्रमांवर निर्बंध आणावेत. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

(335 schools will be started in Nashik district from tomorrow)

loading image